मुढाळे येथून चोरीला गेलेला हायवा डंपर अवघ्या काही दिवसांत जप्त; दोन आरोपी अटकेत
दोन्ही आरोपी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी

मुढाळे येथून चोरीला गेलेला हायवा डंपर अवघ्या काही दिवसांत जप्त; दोन आरोपी अटकेत
दोन्ही आरोपी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी
बारामती वार्तापत्र
मुढाळे येथील पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेल्या हायवा डंपरचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेला डंपरही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी मुढाळे येथील पेट्रोल पंपावरून हायवा डंपर चोरीला गेला होता. त्यानंतर २३ जुलै रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी व तपास पथकाने तातडीने तांत्रिक तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी मार्गावरील ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या आधारे सुमारे २०० ते २५० किलोमीटरपर्यंत वाहनाचा माग काढत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात छापा टाकला. या कारवाईत चोरीला गेलेला हायवा डंपर जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक तपासात आरोपींपैकी एकाने यापूर्वी फिर्यादीच्या भावाच्या डंपरवर चालक म्हणून काम केले होते. या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी पेट्रोल पंपावर उभा असलेला डंपर चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.







