स्थानिक

मोदींचा फ्लेक्स कोसळला… अन् ‘फ्लेक्समुक्त बारामती’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवरबारामती | प्रतिनिधी

कोसळलेला फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आला होता.

मोदींचा फ्लेक्स कोसळला… अन् ‘फ्लेक्समुक्त बारामती’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कोसळलेला फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आला होता.

बारामती वार्तापत्र

बारामती येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फ्लेक्स जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्याने शहरातील फ्लेक्सबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सार्वजनिक ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मोठ्या फ्लेक्सच्या सुरक्षिततेसह “फ्लेक्समुक्त बारामती” या संकल्पनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी शहराचे विद्रूपीकरण, पर्यावरणीय हानी आणि अनावश्यक प्रसिद्धीला आळा घालण्यासाठी बारामती फ्लेक्समुक्त करण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या भूमिकेनंतर बारामती नगरपरिषदेने ‘फ्लेक्समुक्त शहर’चा ठरावही मंजूर केला होता. काही काळ त्याची अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसले; मात्र अलीकडच्या काळात विविध कार्यक्रम, वाढदिवस, स्वागत समारंभ आणि शुभेच्छांसाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स झळकू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, ज्या नगरपरिषदेने फ्लेक्समुक्तीचा ठराव केला, त्याच परिसरात विविध फ्लेक्स दिसत असल्याने नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कोसळलेला फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यामुळे अशा फ्लेक्सना आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती का आणि अपघात घडला असता त्याची जबाबदारी कोणाची असती, असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नगरपरिषदेकडून अनधिकृत फलक, बॅनर आणि अतिक्रमणांवर कारवाई होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मोठे फ्लेक्स कायम दिसत असल्याने कारवाईतील सातत्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

दिवंगत अजितदादा पवार यांनी विकासकामांना प्राधान्य देत अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा संदेश दिला होता. त्यांच्या त्या भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फ्लेक्समुक्तीची मोहीम घोषणांपुरती न राहता प्रत्यक्ष कृतीत दिसणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

(टीप : या वृत्तात स्थानिक पातळीवर व्यक्त होत असलेल्या प्रश्नांचा आणि चर्चेचा आढावा घेण्यात आला आहे. संबंधित प्रशासन किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास ती प्रसिद्ध केली जाईल.)

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_