महिला आंदोलकांशी अशी वागणूक अयोग्य; सरकार आवश्यक कारवाई करेल : अदिती तटकरे
दादर पोलिसांच्या कथित व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या

महिला आंदोलकांशी अशी वागणूक अयोग्य; सरकार आवश्यक कारवाई करेल : अदिती तटकरे
दादर पोलिसांच्या कथित व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या
बारामती वार्तापत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अजितदादा यूथ फाऊंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दादर पोलिसांचा कथित व्हायरल व्हिडिओ, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, पेपरफुट प्रकरण आणि विविध आंदोलनांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
दादर पोलिसांच्या कथित व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, “कोणत्याही महिला आंदोलकासोबत अशा प्रकारचे वर्तन होता कामा नये. अशा कृतीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलिसांवर मोठी जबाबदारी आणि तणाव असतो, मात्र एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी करणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणात सरकार आवश्यक ती कारवाई करेल.”
त्या म्हणाल्या की, संबंधित व्हिडिओ त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला नसून सोशल मीडियावर त्याबाबत माहिती वाचली आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून, सरकारची जबाबदारी म्हणजे लोकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्रुटी दूर करणे आणि योग्य मागण्यांवर निर्णय घेणे होय.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी संवादालाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले. “लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघतो. केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी सोमण वांगचुक यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांनीही संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पुढील पिढी अधिक सक्षम आणि शैक्षणिकदृष्ट्या भक्कम होईल,” असे त्या म्हणाल्या.
पेपरफुटीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “पेपरफुटीचे समर्थन कोणीही करू शकत नाही. हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सकारात्मक चर्चा, सूचना आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत.”
आंदोलनाच्या अधिकाराबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारच्या दृष्टीने प्रत्येक आंदोलन आणि प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे. आंदोलनादरम्यान घडलेली गोंधळाची घटना दुर्दैवी असून, अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







