शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थी, वर्गात झाले ‘गुरू’! बारामतीतील राधेश्याम आगरवाल संस्थेत आगळावेगळा शिक्षक दिन
मुख्याध्यापकांपासून शिपायांपर्यंत भूमिका

शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थी, वर्गात झाले ‘गुरू’! बारामतीतील राधेश्याम आगरवाल संस्थेत आगळावेगळा शिक्षक दिन
मुख्याध्यापकांपासून शिपायांपर्यंत भूमिका
बारामती वार्तापत्र
५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा शिक्षक दिन राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिपाई यांच्या भूमिका वेशभूषेसह साकारल्या. विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विविध वर्गांमध्ये जाऊन शिक्षकांच्या भूमिकेतून अध्यापन केले. त्यामुळे शिक्षक होणे म्हणजे केवळ वर्गात शिकविणे नसून त्यामागे असलेली जबाबदारी, संयम, कर्तव्यभावना आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली.
इयत्ता दहावी ‘ब’ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केले. घाडगे ऐश्वर्या व झगडे वैष्णवी यांनी सूत्रसंचालन केले, तर समृद्धी पवार हिने प्रास्ताविक केले.
शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती राऊत वर्षा, धायगुडे समीक्षा, गवळी सिद्धी आणि गौरी पारेकर यांनी आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडली. शिक्षक म्हणून वर्गात अध्यापन करताना आलेले अनुभवही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यातून ‘शिक्षक होणे म्हणजे केवळ शिकविणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणे होय’ हा संदेश अधोरेखित झाला.
कार्यक्रमात शिंदे प्रणाली हिने सुंदर काव्यगायन सादर करून वातावरण भावपूर्ण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करत डायरी, पेन व पुष्प देऊन शिक्षकांचा सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री. सतीश पाचपुते सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकांचा खरा विजय असतो,” असे प्रतिपादन करत त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. निंबाळकर एस. ए. यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका प्रत्यक्ष अनुभवत साजरा केलेला हा आगळावेगळा शिक्षक दिनाचा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरला.






