
उजनी धरण शंभर टक्के भरले ; बळीराजा सुखावला
पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला
इंदापूरः प्रतिनिधी
पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण मंगळवारी रात्री १०० टक्के भरले आहे, उजनी पाणलोट क्षेत्रात तसेच पुणे परिसरात झालेल्या पाऊसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरण शंभर टक्के भरण्यास ३५ दिवस जास्त लागले.मागील वर्षी धरण ३१ ऑगस्ट रोजी भरले होते.
मागील आठवड्यापासून पुणे आणि उजनी जलाशयाच्या परिसरात पावसाने जोर धरल्याने यशवंत सागर जलाशयाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
उजनी धरणाची एकूण पाण्याची साठवून क्षमता १२१ टीएमसी असून सध्या उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पाणी साठ्यात अशीच वाढ होत राहिली तर भीमेत विसर्ग सोडण्यात येऊ शकतो.
उजनी धरणातील मंगळवारी रात्री अकरा वा.सुमारास पाण्याची स्थिती –
-पाणीपातळी : ४९६.८३५ मीटर
-एकूण पाणीसाठा: ३३२१.७२ द.ल.घ.मी.
– एकूण टी.एम.सी: ११७.२९ टी.एम.सी
– उपयुक्त पाणीसाठा १५१८.९१ द.ल.घ.मी.
– टक्केवारी : १००.११ टक्के