राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मारहाण; भाजपच्या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे.
राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मारहाण; भाजपच्या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे.
पुणे,प्रतिनिधी
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली नागवडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करुन शिवीगाळ करणं, धमकावणं, अश्लील हातवारे करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यात महागाईच्या मुद्यावरुन जोरदार राजकीय राडा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत शहरातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. बालगंधर्व सभागृहात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरने केला आहे.
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करीत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
काय घडलं पुण्यात?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर पुण्यात काल राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी अंडी फेकली. यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात स्मृती इराणींचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. बालगंधर्व रंगमंदिरात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.