राजकीय

शिवनगरच्या व्यासपीठावर गोडव्याचे संकेत? युगेंद्रची इच्छा आजोबांनी पूर्ण केली; सुनेत्रा काकींनी केला सत्कार, पवार कुटुंबातील दुरावा कमी होणार?

“साखरपेरणीतून सुरू झालेला गोडवा आता पवार कुटुंबातील कटुता कमी करणार का?

शिवनगरच्या व्यासपीठावर गोडव्याचे संकेत?
युगेंद्रची इच्छा आजोबांनी पूर्ण केली; सुनेत्रा काकींनी केला सत्कार, पवार कुटुंबातील दुरावा कमी होणार?

“साखरपेरणीतून सुरू झालेला गोडवा आता पवार कुटुंबातील कटुता कमी करणार का?

बारामती वार्तापत्र 

बारामतीच्या राजकीय आणि सहकारी वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पवार कुटुंबातील नातेसंबंधांना मंगळवारी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीत नवे वळण मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पार्थ अजित पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांची विश्वस्त मंडळावर मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच बैठकीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष या नात्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संस्थेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

या बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला तो म्हणजे सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवार यांचा केलेला सत्कार. गेल्या काही वर्षांत पवार कुटुंबातील विविध राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग केवळ औपचारिक न राहता त्याचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.

विश्वस्त मंडळावरील मानद सदस्यपदाच्या माध्यमातून संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याची युगेंद्र पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सहकार क्षेत्रात सुरू होती. अखेर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा निर्णय घेत युगेंद्र आणि पार्थ पवार यांना मानद सदस्य म्हणून संधी दिली. त्यामुळे पवार कुटुंबातील नव्या पिढीला संस्थात्मक जबाबदारी देण्याचा संदेश या निर्णयातून गेल्याचे मानले जात आहे.

याचवेळी संस्थेच्या उपाध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सार्वजनिक व्यासपीठावर घडलेल्या या प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय मतभेद एका बाजूला ठेवून कुटुंबातील संवाद वाढविण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही माळेगाव परिसरातील महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे. शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि सहकार क्षेत्राशी संस्थेचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या संस्थेतील बदलांकडे केवळ शैक्षणिक निर्णय म्हणून नव्हे, तर बारामतीच्या सहकार आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जाते.

बैठकीत बोलताना शरद पवार यांनी पार्थ आणि युगेंद्र यांच्या सहभागामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविता येतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्यापासून शिवनगर संस्थेपर्यंत एकाच व्यासपीठावर दिसलेले हे चित्र आता चर्चेचा विषय ठरले आहे. “साखरपेरणीतून सुरू झालेला गोडवा आता पवार कुटुंबातील कटुता कमी करणार का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. आगामी काळात सहकार, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत या नव्या समीकरणांचा नेमका काय परिणाम होतो, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button