सासरच्या दारातच विवाहितेवर अंत्यसंस्कार… बारामती तालुक्यातील घटना
विषारी औषध सासू, पती, सासरे यांनीच पाजले असल्याचा आरोप गीतांजलीच्या नातेवाईकांनी केला.
सासरच्या दारातच विवाहितेवर अंत्यसंस्कार… बारामती तालुक्यातील घटना
विषारी औषध सासू, पती, सासरे यांनीच पाजले असल्याचा आरोप गीतांजलीच्या नातेवाईकांनी केला.
क्राईम; बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सांगवी येथील विवाहितेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर, तिचा मृतदेह आज दुपारी साडेबारा वाजता ससून रुग्णालयातून घेऊन विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगवी येथे तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. पती, सासू, नणंद, सासरे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत तिचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केला.
सांगवी येथील गितांजली अभिषेक तावरे (वय २१) या विवाहितेने तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. दोन दिवसांपूर्वी या महिलेला पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. गुरुवारी (दि. २७) गितांजलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. लग्नाला एकच वर्ष झाल्याने माहेरचे नातेवाईक संतप्त झाले होते. संतप्त नातेवाईक मुलीच्या सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावर ठाम होते. गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सलग दोन दिवस बंदोबस्त तैनात केला होता. अखेर गावातील काही मंडळींनी व सासरच्या लोकांनी हे प्रकरण चिघळू नये म्हणून संमती दिल्यानंतर घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावर एकमत झाले.
गुरसाळे (ता. माळशिरस) येथील सुनील लालासाहेब यादव यांची कन्या गितांजली व सांगवी (ता. बारामती) येथील वसंत केशव तावरे यांचे चिरंजीव अभिषेक यांचा गेल्यावर्षी सांगवी येथे विवाह झाला होता. या विवाहानंतर गेली वर्षभर ५० तोळे सोने, किमती साड्या माहेरहून घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप विवाहितेची आई मनिषा यादव, चुलती नमीता यादव व चुलते पै. अरुण लालासाहेब यादव यांनी अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना केला.
नातेवाईकांनी सासू, सासरा, पती व नणंद यांनीच जबरदस्तीने विष पाजूनच घातपात घडवून आणल्याबद्दल घरासमोर बोंबाबोंब करत, हात चोळत शिव्याशापांची लाखोली वाहत संताप व्यक्त केला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.