सोमेश्वरमध्ये सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची विजयी सुरुवात!; संग्राम सोरटे ९२ मते मिळवत विजयी
१३१ पैकी ९२ मते मिळवत ‘ब’ वर्ग गटातून विजय; अजितदादांना विजय समर्पित करत सोरटेंची मोठी घोषणा!

सोमेश्वरमध्ये सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची विजयी सुरुवात!; संग्राम सोरटे ९२ मते मिळवत विजयी
१३१ पैकी ९२ मते मिळवत ‘ब’ वर्ग गटातून विजय; अजितदादांना विजय समर्पित करत सोरटेंची मोठी घोषणा!
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज, सोमवार (१२ ऑक्टोबर) रोजी सकाळी नऊ वाजता माळेगाव येथे सुरुवात झाली. या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलने खाते उघडले आहे. ‘ब’ वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण १३१ पैकी ९२ मते मिळाली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले असून, या निकालामुळे मतमोजणीतील उत्सुकता आणखी वाढली आहे. कारखान्याच्या २१ संचालक जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८४.२५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने उभे केलेले पॅनेल आणि युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल, अशी तिरंगी लढत झाली.
🗣️ ‘हा विजय अजितदादांच्या चरणी समर्पित!’
विजयानंतर संग्राम सोरटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत हा विजय दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित केला. तसेच सुनेत्राताई पवार, पार्थदादा आणि जयदादा यांना या विजयाचे श्रेय दिले.
सोरटे म्हणाले, “आजचा हा विजय मी माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या चरणी समर्पित करतो. तसेच वहिनी सुनेत्राताई पवार, पार्थदादा आणि जयदादा यांना या विजयाचे श्रेय देतो. बारामतीमध्ये जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत दादांचे, परिवाराचे आणि कार्यकर्त्यांचे नाव पुढे राहणार आहे.”
उर्वरित जागांबाबतही त्यांनी विश्वास व्यक्त केला. “राहिलेल्या २० जागा आमच्याच असणार आहेत. मोठ्या फरकाने आमचे पॅनेल विजयी होणार आहे,” असा दावा संग्राम सोरटे यांनी केला. मात्र, उर्वरित जागांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्याने अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
🔥 सुनेत्रा पवारांचा ‘२१-०’ विजयाचा विश्वास!
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी आणि मतमोजणी केंद्रावर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पॅनेलच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या पॅनेलचा २१ पैकी २१ जागांवर विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
खासदार पार्थ पवार यांनीही ही निवडणूक एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. २१ पैकी २१ जागा जिंकण्याचा आमच्या पॅनेलचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. या दाव्यांची कसोटी आता प्रत्यक्ष निकालांत लागणार आहे.
📊 उर्वरित निकालांकडे लक्ष
संग्राम सोरटे यांच्या विजयाने सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे खाते उघडले असले, तरी उर्वरित २० जागांचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. सोमेश्वर कारखान्यावरील वर्चस्वासाठी झालेल्या या तिरंगी लढतीत कोणत्या पॅनेलला किती जागा मिळतात, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




