१० दिवसांची जगण्याची लढाई संपली;बारामतीच्या अपघातातील तिसऱ्या शिकाऊ पायलटचा मृत्यू..!
पण जाता जाता अवयवदानामुळे 8 रुपांनी जिवंत राहीली

१० दिवसांची जगण्याची लढाई संपली;बारामतीच्या अपघातातील तिसऱ्या शिकाऊ पायलटचा मृत्यू..!
पण जाता जाता अवयवदानामुळे 8 रुपांनी जिवंत राहीली
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडीजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यु झाला. त्यांचे सहकारी असलेली तरुणी गेले ९ दिवस मृत्युशी झुंज देत होती.
तिच्या मेंदुला झालेल्या दुखापतीमुळे ती गंभीर होती. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
तिने जाता जाता आठ जणांना अवयवदान केलं. त्यामध्ये ह्र्दय, डोळे, किडनीसह आठ अवयव तिचे दान करण्यात आले आहेत. मंगळवारी तिला पुण्यात साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
दि. ९ डिसेंबरच्या पहाटेच्या दरम्यान कृष्णाशू मंगल सिंग, दक्षू विष्णू शर्मा, चेश्ता ज्योतीप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कणसे हे चौघेजण जण भिगवणनजिकच्या उजनी पाणवट्यावर निघाले होते. कृष्णाशू हा चालवत असलेल्या टाटा हॅरीहर कंपनीच्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याकडेच्या झाडाला धडकून लोखंडी पाईपलाईनवर पलटी झाली.
यामध्ये गाडीचा जवळपास १९० चा अतिवेग असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे अपघातानंतर ही गाडी तब्बल १५० फूट लांब घसरत जाऊन हा अपघात झाल्याने या अपघातात आदित्य कणसे व दक्षू शर्माहे दोघे जागीच मृत झाले, तर चेश्ता गंभीर जखमी झाली व कृष्णांश ही जखमी झाला. चेश्ता हिला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दरम्यान कृष्णांशू हा उपचारातून बरा झाला असून मंगळवारी त्याला दवाखान्यातून सोडण्यात आले आहे.
दरम्यान चेश्ता ही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कुटुबियांनी डॉक्टरांशी चर्चा करून तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. यामध्ये हृदय, किडनी, डोळे, आतड्याचे अवयवदान करण्यात आल्याचे तिच्या निकटवर्तीयांनी बोलताना सांगितले.