राजकीय

१५ ऑगस्टला कुटुंबासह आत्महानी करणार? बिनविरोध नगरसेवकाच्या पत्राने बारामतीत खळबळ

सहा महिन्यांपासून अपमान, त्रास आणि भीतीचा आरोप; तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा मासाळ यांचा दावा

१५ ऑगस्टला कुटुंबासह आत्महानी करणार?
बिनविरोध नगरसेवकाच्या पत्राने बारामतीत खळबळ

सहा महिन्यांपासून अपमान, त्रास आणि भीतीचा आरोप; तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा मासाळ यांचा दावा

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेचे बिनविरोध नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांनी विविध राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, धनगर समाजातील पदाधिकारी आणि सहकाऱ्यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या पत्रामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण आणि आपल्या कुटुंबीयांना अपमान, त्रास आणि भीतीचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर दावा मासाळ यांनी पत्रातून केला आहे.
आपल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात बारामती शहर पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विविध तारखांना अर्ज दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मासाळ यांनी पत्रात २९ एप्रिल, २५ मे, ६ जुलै आणि २१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अर्जांचा संदर्भ दिला आहे. तसेच फेसबुक संदेश, व्हॉट्सॲप चॅट, स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.मात्र, या तक्रारींवर अपेक्षित ती कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाच न्याय मिळतो का?असा सवालही त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.
मासाळ यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी कुटुंबासह आत्महानी करण्याचा इशारा पत्रातून दिल्याचा दावा आहे. त्यानंतर बारामती पोलिसांना जाब विचारावा, अशी विनंती त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.या इशाऱ्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अनेक पटींनी वाढले आहे. हा विषय केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा प्रशासकीय तक्रारीपुरता मर्यादित राहिलेला नसून, एका कुटुंबाच्या सुरक्षिततेचा थेट प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र दिलेल्या तक्रारी अर्जानुसार मासाळ यांना अनेकवेळा बोलून ते प्रशासनास सहकार्य करत नाही किंवा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तपासात सहकार्य करत नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.
——
तक्रारींची दखल घेतली का?
मासाळ यांच्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या तक्रारी, त्यातील आरोप आणि कथित इलेक्ट्रॉनिक पुरावे यांची स्वतंत्र व निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे. आरोपांची सत्यता तपासण्याची जबाबदारी संबंधित तपास यंत्रणेची आहे.
—-

Back to top button