
२० हजारांची लाच घेताना महिला पोलिस अटकेत; बारामती खळबळ
पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच
बारामती वार्तापत्र
२० हजार रुपयांची लाच स्विकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील महिला हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय ३८, रा. निर्मिती विहार सोसायटी, रुई, बारामती) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली. बुधवारी (दि. १०) रोजी दुपारी ही कारवाई केली गेली.
या प्रकरणी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार व त्यांची पत्नी, सासू-सासरे व मेहुणा यांच्या विरोधात मेहुण्याच्या पत्नीने बारामती तालुका पोलिस ठाण्यात २ सप्टेंबर २०२५ रोजी शारिरिक व मानसिक छळ प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास अंजना नागरगोजे या करत होत्या. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या तीन नातेवाईक यांना गेट जामिन देवून अटक न करण्यासाठी नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती तक्रारदार व त्यांची पत्नी आणि सासू-सासरे या चौघांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण २० हजार रुपये द्या अशी मागणी केली गेली.
परंतु, तक्रारदाराला ती मान्य नसल्याने दि. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फोनद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी पडताळणी करण्यात आली. नागरगोजे यांनी तक्रारदार व त्यांच्या तीन नातेवाईकांना दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गेट जामिन देवून अटक न करण्यासाठी २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस ठाण्यातच लाच स्विकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक शिरीष देशपांडे, अप्पर अधिक्षक अजित पाटील, अर्जून भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सवर्दा सावळे व त्यांच्या पथकाने केल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपअधिक्षक दयानंद गावडे यांनी दिली.