60 ग्रामपंचायतींपैकी 60 ते 65 टक्के मतदारांचा कल भाजपा कडे – हर्षवर्धन पाटील
इंदापूर येथे बोलताना केले मत व्यक्त
60 ग्रामपंचायतींपैकी 60 ते 65 टक्के मतदारांचा कल भाजपा कडे – हर्षवर्धन पाटील
इंदापूर येथे बोलताना केले मत व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील नुकत्याच पारपडलेल्या ६० ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३८ ग्रामपंचायतीवर दावा केला होता तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील ४२ ग्रामपंचायतीवर आमचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे ठामपणे सांगून रविवार ( दि.१४ ) रोजी नूतन सरपंच व उपरपंच यांसह सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र एक दिवस अगोदरच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहा सांस्कृतिक भवन येथे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व नूतन ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ घेत एकंदरीत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात सरपंच,उपसरपंच यांसह नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान करत भारतीय जनता पक्षाकडून शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, तालुक्यातील कोणतीही सत्ता आपल्याकडे नसताना कार्यकर्त्यांनी जी कामगिरी करून जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आणल्या त्या बद्दल सर्व कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.आपण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून गावाचा विकास करावा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणादरम्यान बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले गेले आहे. ग्रामपंचायत ही संस्था समाजसेवेचे प्रभावी साधन आहे. ग्रामपंचायत सदस्यांचा सगळ्यात जास्त संपर्क हा मतदारांशी असतो. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सरपंच व उपसरपंचानी चांगले काम करावे. आम्ही 38 सरपंचांचा दावा केला होता परंतु आज प्रत्यक्षात मात्र 37 सरपंच उपस्थित आहेत. एका सरपंचावर दबाव आणला गेला त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.एकूण 60 ग्रामपंचायतींपैकी 60 ते 65 टक्के मतदारांचा कल हा भाजपकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील जनतेने दाखवून दिलं आम्ही सत्तेच्या मागे जाणार नाही तर आम्ही फक्त सत्याच्या मागे जाणारे आहोत.
*अजित पवारांवर केला पलटवार*
दि.६ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील भरसभेत दूध संघ बंद पडला असा आरोप केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले की, अजित पवार हे कदाचित चिट्टी वाचून बोलले असतील. दूध संघाने आतापर्यंत 50 कोटी रुपयांची बिल शेतकऱ्यांना दिली आहेत.सत्तेत येण्यापूर्वी वीज बिल माफ करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन देणारे व आता सत्तेत बसलेले शब्द फिरवायला लागलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने काय काम केले?तर शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम या सरकारने केले असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती आप्पासाहेब जगदाळे,मा.जि.प सदस्य श्रीमंत ढोले,तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार,भरत शहा,मुकुंद शहा, विलासराव वाघमोडे, लालासाहेब पवार,कांतीलाल झगडे,शहराध्यक्ष शकील सय्यद,नगरसेवक कैलास कदम,मंगेश पाटील,पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे,माऊली चवरे,नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.