बारामतीचे डॉक्टर भंडाऱ्यातील आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला मदत करणार
भंडारा जिल्ह्यातील भानारकर दाम्पत्याला तब्बल 14 वर्षांनी संतती प्राप्त झाली होती.

बारामतीचे डॉक्टर भंडाऱ्यातील आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला मदत करणार
भंडारा जिल्ह्यातील भानारकर दाम्पत्याला तब्बल 14 वर्षांनी संतती प्राप्त झाली होती.
बारामती वार्तापत्र
भंडाऱ्यातील दवाखान्याला लागलेल्या आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला. भानारकर दाम्पत्याची मुलगीही यात होती. मात्र आता या दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले आहेत. भानारकर दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून संतती प्राप्त करुन देण्यासाठीचा खर्च उचलणार डॉक्टर उचलणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील भानारकर दाम्पत्याला तब्बल 14 वर्षांनी संतती प्राप्त झाली होती. परंतु या आगीत त्या मुलीचाही मृत्यू झाला. या दाम्पत्यावर ओढवलेला बिकट प्रसंग पाहून बारामतीमधील डॉक्टर भानारकर कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले आहेत. या दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संतती प्राप्त करुन देण्यासाठी बारामतीमधील इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आली आहे. याचा संपूर्ण खर्च बारामतीमधील डॉक्टर उचलणार आहेत
हिरालाल आणि हिरकन्या भानारकर यांचे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून दोघांनी त्यांच्या घरी मूल जन्माला येईल असं स्वप्न पाहिले होते. मात्र, चार वेळा गरोदर राहून देखील हिरकन्या कधीच जिवंत बाळाला जन्म देऊ शकल्या नाहीत. चारही वेळेला त्यांच्या बाळाचा जन्मताच मृत्यू झाला.
यंदा वयाच्या 39 व्या वर्षी त्या पाचव्यांदा गरोदर राहिल्या. यंदा काहीही करुन आपलं बाळ जगला पाहिजे असा त्यांनी निर्धार केला होता. परिस्थिती गरीब, हातावर पोट असूनही या दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात उपचार केले, महागडी औषधं घेतली.
त्यानंतर 6 जानेवारीला साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हिरकन्या यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. हे बाळ जगलं यामुळे सर्व आनंदित होते. मात्र जन्माला आलेली मुलगी अवघ्या 1 किलो वजनाची होती. परिणामी तिला लगेच भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील SNCU ला दाखल करण्यात आले. तिथे ती दोन दिवस राहिली आणि 8 तारखेच्या रात्री लागलेल्या आगीत हिरकन्या आणि हिरालाल यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला
आधीचे चार वाईट अनुभव गाठीशी असलेल्या हिरकन्या आणि हिरालाल यांनी यंदा त्यांच्या घरी लहान मूल हसेल, खेळेल असे स्वप्न पाहिले होते. मात्र, शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारात त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं
बारामतीमधील डॉक्टरांनी या दाम्पत्याला मदत करण्याचा निर्धार केला. या दाम्पत्याला आता टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अपत्यप्राप्तीचं सुख द्यावं यासाठी हे डॉक्टर सरसावले आहेत. टेस्ट ट्यूब बेबी ही महागडी उपचारपद्धती आहे. परंतु आगीच्या दुर्दैवी घटनेत आपल्या बाळाला गमावलेल्या भानारकर दाम्पत्याला पुन्हा अपत्य प्राप्त व्हावं यासाठी या ट्रीटमेंटचा सगळा खर्च बारामतीमधील डॉक्टर करणार आहेत.