वंचित बहुजन आघाडीच्या इंदापूर पंचायत समिती समोरील आंदोलनास यश
गटविकास अधिकारी यांनी पत्र दिल्याने आंदोलन मागे

वंचित बहुजन आघाडीच्या इंदापूर पंचायत समिती समोरील आंदोलनास यश
गटविकास अधिकारी यांनी पत्र दिल्याने आंदोलन मागे
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील आनंदनगर येथील दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.१० मार्च पासून बेमुदत आंदोलन छेडले गेले होते.अखेर या आंदोलनकर्त्याना दि.१३ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कारवाई संदर्भात पत्रक दिल्याने सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले असून आंदोलनास यश मिळाले आहे.
मौजे आनंदनगर येथील संबधीत रस्त्या संदर्भात प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांनी रस्त्यासाठी अडथळा खुला करण्याबाबत आदेश गटविकास अधिकारी तसेच श्री.मोहोळकर आणि श्री.वाघ यांना दिले असताना देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने यांवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारित २०१९ नुसार कारवाई करण्यात यावी म्हणून इंदापूर पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन छेडण्यात आले होते.
दरम्यान इंदापूर पंचायत समिती कडून आंदोलनकर्त्यांच्या पत्रव्यवहारास अनुसरून ग्रामपंचायत आनंदनगर यांना ९ मार्च २०२१ व २० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीने श्री.मोहोळकर यांना २ नोटिसा २० फेब्रुवारी व १० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ अन्वये देण्यात आलेल्या आहेत असे म्हंटले असून प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सदर अतिक्रमण धारकास किमान तीन नोटिसा देणे आवश्यक आहे, तरी सदर नोटीस कालावधी संपल्यानंतर अतिक्रमण न काढल्यास संबंधितांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ अन्वये कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
याबाबतचे पत्र इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा राणी कोकाटे, माऊली नाचण,प्रमोद चव्हाण,हमीद आत्तार,पवन पवार,अविनाश गायकवाड यांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.