पुणे

निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी करण्याचे आवाहन

नोंदणीसाठी ‘मँगोनेट’ व ‘अनारनेट’ ऑनलाईन प्रणालीची सुविधा

निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी करण्याचे आवाहन

नोंदणीसाठी ‘मँगोनेट’ व ‘अनारनेट’ ऑनलाईन प्रणालीची सुविधा

पुणे, प्रतिनिधी

युरोपियन युनियन, अमेरीका, कॅनडा व अन्य देशांना आंबा व डाळिंब निर्यात करण्याकरीता निर्यातक्षम फळबागांची अनुक्रमे ‘मँगोनेट’ व ‘अनारनेट’ ऑनलाईन प्रणालीअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. या दोन्ही ऑनलाईन प्रणाली कालपासून (गुरुवार) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाने राज्यातील आंबा व डाळिंब पिकांखालील क्षेत्र लक्षात घेऊन निर्यातीला चालना देण्यासाठी जिल्हानिहाय निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबाग नोंदणी लक्षांक निश्चित केलेला आहे. २०२०-२१ मध्ये ‘मँगोनेट’अंतर्गत ११ हजार ९९५ आंबा व ‘अनारनेट’प्रणाली अंतर्गत १ हजार ५१८ डाळिंब फळबागांची नोंदणी झालेली होती.

चालू वर्षी २०२१-२२ मध्ये निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची मँगोनेट व अनारनेट प्रणाली अंतर्गत नोंदणी करणेकरीता खास मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व जिल्हानिहाय देण्यात आलेल्या लक्षांकानुसार निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची नोंदणी व तपासणी करण्याकरीता कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकाऱ्यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अपेडाने ‘फार्म रजिस्ट्रेशन’ मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे.

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त आंबा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांची नोंदणी करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ.कैलास मोते यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button