इंदापूर

मी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता ! प्रदीप गारटकर व अजित दादांनाच मानतो ; गजानन गवळी यांचं वक्तव्य

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव घेणे टाळले

मी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता ! प्रदीप गारटकर व अजित दादांनाच मानतो ; गजानन गवळी यांचं वक्तव्य

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव घेणे टाळले

इंदापूर : प्रतिनिधी

गेली दहा वर्ष इंदापूर नगरपरिषदेत गटनेता म्हणून काम केलं हे सर्व प्रदिपदादांनी दिलेल्या संधीमुळे व मार्गदर्शनामुळे करू शकलो. त्यामुळे मी जरी काही बोललो असेल ही मनातील खदखद होती.त्यामुळे राष्ट्रवादी सोडायचा प्रश्नच उपस्थित होत नाही.मी केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास करू नये असा खुलासा इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते गजानन गवळी यांनी केला आहे. मात्र हा खुलासा करताना त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव घेणे प्रकर्षाने टाळले आहे.

गजानन गवळी यांनी दि.१२ जानेवारी रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर बोट दाखवत सदरील विभागाकडून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला होता.तद्नंतर दुसऱ्याच दिवशी दि.१३ जानेवारी रोजी इंदापूर नगरपरिषदेतील नियमित असणाऱ्या परंतु मृत्युमखी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तसेच काही त्रुटींमुळे नियमित नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची फाईल सामान्य प्रशासन विभाग पुणे यांच्याकडे असून कामात दिरंगाई होत आहे.आमचंच सरकार असताना कामं होत नाहीत ही मोठी शोकांतिका असल्याचं म्हणत ना. भरणेंच्याकडे असणाऱ्या दोन्हीं खात्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत घरचा आहेर दिला होता.

दरम्यान मंगळवारी (दि.२५) बोलताना गवळी म्हणाले की,प्रदिपदादा गारटकर व आमचे घरगुती संबंध आहेत.त्यांनी इंदापूर नगरपरिषदेत ४५ वर्षे एकाकी झुंज दिली.माझ्या दोन्ही चूलत्यांना नगरसेवक केले.एकाला नगराध्यक्ष केले.ते स्वतः सन १९९२ ते १९९७ दरम्यान नगराध्यक्ष होते.शहरातील वडीलधाऱ्या व जेष्ठ लोकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून अनेक वर्षे हर्षवर्धन पाटील यांना विरोध केला.ज्या वडीलधाऱ्या ज्येष्ठांना नगरसेवक तसेच नगराध्यक्ष म्हणून संधी दिली ते नेहमीच आमच्या बरोबर आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही दादांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे करणार असून कायमस्वरूपी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे.

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा विचार होणार…

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व इंदापूर शहरातील नगरसेवक, शहराध्यक्ष यांच्यात एक बैठक झाली. यापुढे इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार होणार असून, भविष्यात पक्षात होणारे जे काही निर्णय आहेत ते निर्णय या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊनच घेतले जातील असेही या बैठकीत निर्णय झाल्याचे गटनेते गजानन गवळी यांनी सांगितले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव घेणे प्रकर्षाने टाळले…

आमचे नेते व सर्वस्वी हे राष्ट्रवादी पुणे जिल्हा पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हेच असून गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही त्यांचे एकनिष्ठ पणाने काम करीत आहोत व यापुढेही गारटकरदादांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहणार आहोत. इंदापूर शहरातील काही प्रश्न असतील तसेच इंदापूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा जो सध्या चर्चिला जाणारा प्रश्न आहे,
या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन इंदापूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविणार असल्याची चर्चा गारटकर यांच्यासोबत झाली असल्याचे गवळी यांनी सांगितले हे सांगताना मात्र त्यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव घेणे प्रकर्षाने टाळले. त्यामुळे गटनेते गवळी व राज्यमंत्री भरणे यांच्यात गुप्त वाद असल्याचे दिसून येत आहे.

ती माझी खदखद होती _ गजानन गवळी..

गेल्या आठवड्यात गटनेते गवळी यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सार्वजनिक बांधकाम खाते व सामान्य प्रशासन विभागाच्या गलथान कारभारावरती बोट ठेवत टीकास्त्र केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली होती, गटनेते गवळी यांचे निलंबन होणार की काय अशी चर्चा सर्वत्र होत होती, मात्र तसे अद्याप पर्यंतही झालेले दिसून येत नाही. यावर गवळी म्हणाले की,मी जे काही वक्तव्य केले आहे ती माझी खदखद होती, जे काही प्रश्न उपस्थित होत होते ते मी तालुक्यात समोर मांडले आहेत याचा कुणी विपर्यास करू नये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून प्रदिपदादा गारटकर व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button