इंदापूर

कौठळीच्या कथित अपहारप्रकरणी ‘गाढव-हलगी’ मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध!

कौठळीच्या कथित अपहारप्रकरणी ‘गाढव-हलगी’ मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध!

तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी; प्रशासकीय भवनापासून पंचायत समितीपर्यंत आंदोलन

इंदापूर ; प्रतिनिधि

कौठळी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमितता, शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यास होत असलेली दिरंगाई आणि विविध प्रशासकीय मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत बुधवारी (ता. ४) ‘गाढव-हलगी’ मोर्चा काढण्यात आला. साहेबराव वाल्मीक पिसाळ, अमित राजेंद्र मारकड (पाटील) आणि कौठळी ग्रामस्थांच्या वतीने इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनासमोरून पंचायत समितीच्या आवारापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करीत विविध मागण्या करण्यात आल्या. मोर्चानंतर गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

कौठळी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ३१ डिसेंबर २०१५ आणि २८ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र व अपात्र नोंदींबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यासंदर्भात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच अमित मारकड यांची नोंद रद्द करण्याच्या कार्यवाहीवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

कौठळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी भिवाजी काळे यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता व अपहार आढळल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित चौकशी अहवालानुसार दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक पाचमधील ग्रामनिधी, पाणीपुरवठा आणि समाजकल्याण विभागाची कॅशबुक उपलब्ध नसल्याचा मुद्दाही आंदोलकांनी उपस्थित केला. संबंधित अभिलेखांची तपासणी करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या मागण्यांवर २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यवाही करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मोर्चात माजी सरपंच प्रकाश काळेल, साहेबराव पिसाळ, माऊली काळेल, सतीश काळेल, बंडू काळेल, सचिन यमगर, रोहित बंडगर, राहुल माने, आबा मारकड, पांडुरंग मारकड आदी सहभागी झाले होते.

Back to top button