जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव
रांगोळी, तोरणे व फुलांची सजावटही केली जाणार
जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव
रांगोळी, तोरणे व फुलांची सजावटही केली जाणार
पुणे,प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, आंबेगाव तालुक्यातील पेठ, इंदापुर तालुक्यातील तरंगवाडी येथे मुलांसाठी व खेड तालुक्यातील चांडोली येथे मुलींसाठी अशा ४ निवासी शाळेत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जून पासून होत आहे. जिल्ह्यातील या सर्व निवासी शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
समाजकल्याण आयुक्त यांच्या सूचनेप्रमाणे या शैक्षणिक वर्षात शासकीय निवासी शाळा प्रवेशोत्सवाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या दिवशी प्रभातफेरीचे आयोजन, विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत तसेच पुस्तके, स्टेशनरी वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रांगोळी, तोरणे व फुलांची सजावटही केली जाणार आहे. शैक्षणिक वर्षातील प्रथम दिवशी विद्यार्थ्यांच्या जेवणात गोड जेवणाचा समावेश करण्यात येणार आहे.
सर्व निवासी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक, जीम साहित्य, ई लायब्ररी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, सायन्स सेंटर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी निवासी शाळेमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन श्रीमती डावखर व विशेष समाजकल्याण अधिकारी एम.आर. हरसुरे यांनी केले आहे.