विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम संपन्न
" मन में है विश्वास "
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम संपन्न
” मन में है विश्वास ”
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्यानुसार ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” हा उपक्रम संपन्न झाला .
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यातील विद्यापीठे , महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था व सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
प्रस्तुत उपक्रमांतर्गत दरवर्षी दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा राबविण्याबाबत शासन परिपत्रकान्वये निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाविद्यालयातील मराठी विभागात १५ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वरील उपक्रम पार पडला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथपाल डॉ.अलका जगताप व ग्रंथालय समितीचे प्रमुख प्रा. राजकुमार कदम यांच्याबरोबरच मराठी विभागाचे प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे , डॉ.श्रीराम गडकर व प्रा. तुषार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमात मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या ” मन में है विश्वास ” या लोकप्रिय आत्मकथनातील हृदयस्पर्शी अनुभवांचे अभिवाचन केले. प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी या आत्मकथनातील सुपरिचित सनदी अधिकारी भूषण गगराणी यांच्या प्रेरणेतून विश्वास नांगरे पाटील यांना आपले ध्येय कसे गवसले ? हा भाग सादर केला. ग्रंथपाल डॉ. अलका जगताप व समिती प्रमुख प्रा.राजकुमार कदम यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.
दिनेश पाटील, माऊली थोरात , ताहा पिंजारी ,पूजा कदम, शुभम तरडे ,समर्थ सर्जे आदी विद्यार्थ्यांनी वरील पुस्तकाचे अभिवाचन केले.मुस्कान शेख व हर्षद जाधव यांना विशेष प्राविण्याबद्दल मराठी विभागाच्या वतीने ” मन में है विश्वास ” हे पुस्तक भेट देण्यात आले.
मराठी विभागाचे प्रमुख डॉ आनंदा गांगुर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या उपक्रमामागील भूमिका विशद केली .डॉ. श्रीराम गडकर यांनी सूत्रसंचालन केले तर अमृता मोहिते या विद्यार्थिनीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.