शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याचे निर्णय घेणार;कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
इंदापुरातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याचे निर्णय घेणार;कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही
इंदापुरातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन..
इंदापूर प्रतिनिधी –
कृषी खात्यात काही इतिहासकालीन योजना अद्यापही सुरू आहेत, त्या बंद करणे आवश्यक आहे. कृषी खाते खरेदीवेळी असलेल्या लिंकिंग पद्धतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पीक विमा पद्धतीबाबतही तक्रारी असून, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल असे निर्णय घेऊ,” अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित भव्य कृषी, जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो या पाच दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री कोकाटे यांच्याहस्ते इाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे होते. यावेळी अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जिल्हा बँकचे संचालक माउली दाभाडे व अप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके आदी उपस्थित होते.
यावेळी कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, “कृषी खात्यामध्ये अधिकारी, कर्मचारीयांची कोणतीही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांनी अडचणीबाबत थेट संपर्क करावा, भविष्यकाळात शेतीमधील उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता अधिकाधिक वाढवण्याबाबत संशोधनाला प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी कृषी प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहेत.”
क्रिडा मंत्री भरणे म्हणाले, “देशामध्ये कृषी क्षेत्राला महत्वपूर्ण स्थान आहे. सध्याच्या शेतीच्या उत्पादन क्षमतेतबदल करून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, यासाठी कृषी प्रदर्शन फायदेशीर आहेत. राज्यात नाशिक पाठोपाठ नवीन शेतीचे प्रयोग इंदापूर तालुक्यात केले जातात, याचा अभिमान आहे. शेतीमध्ये इंदापूर तालुका बारामतीपेक्षाही पुढे आहे.”
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा.”
शेती हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे एका दिवसात काम करणे शक्य नाही, पण येत्या वर्षभरात नक्कीच राज्याच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसेल आणि याचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल.
माणिकराव कोकाटे,कृषिमंत्री