इंदापूर पॉलिटेक्निकमध्ये पर्यावरण दिनाचे जनजागृतीमूलक आयोजन
प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर करण्याचे आवाहन केले.

इंदापूर पॉलिटेक्निकमध्ये पर्यावरण दिनाचे जनजागृतीमूलक आयोजन
प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर करण्याचे आवाहन
इंदापूर; प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वर्षीच्या “प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता” या घोषवाक्याशी सुसंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी कवडे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “पर्यावरण रक्षण ही केवळ सरकार, संस्था किंवा काही निवडक लोकांची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
प्लास्टिकचा वापर कमी करणे, वृक्षारोपण करणे, वीज व पाण्याची बचत करणे – अशा लहान लहान कृतींचा मोठा परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. आपल्या कृतींमधून पर्यावरण संवर्धन शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी पर्यावरणात अभियांत्रिकी क्षेत्राचे मोलाचे योगदान स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण हे जागतिक संकट आहे. पाण्यातील मायक्रोप्लास्टिकचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे. यासाठी आपले महाविद्यालय संशोधनात्मक उपक्रम हाती घेईल.”
तसेच, त्यांनी उपस्थितांना प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल जगताप, प्रा. सचिन पवार, प्रा. मुजामिल शेख आणि प्रा. बापूसाहेब पवार यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला पॉलिटेक्निकमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.