बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात नियम मोडणाऱ्या १०७ वाहनांवर कारवाई
एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचा दंड

बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात नियम मोडणाऱ्या १०७ वाहनांवर कारवाई
एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचा दंड
बारामती वार्तापत्र
बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तीन दिवसांत तब्बल १०७ वाहनांवर कारवाई करत १,०५,५०० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
ही कारवाई १२, १३ आणि १५ जुलै २०२५ या तीन दिवसांत करण्यात आली.
वाहनांवर ट्रिपल सीट बसणे, अतिवेगाने गाडी चालवणे, काळ्या काचा, चुकीच्या किंवा नंबर नसलेल्या प्लेट्स अशा प्रकारांवर ही कारवाई होती. टीसी कॉलेज परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. याआधीही या परिसरात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तीन दिवसांचे विशेष पथक तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आली. कारवाई दरम्यान काही वाहनचालकांनी पोलिसांचा थांबण्याचा इशारा दुर्लक्षित करून वाहन घेऊन पळ काढला. त्यामध्ये (एम.एच.४२ बी.ई. १०६२) या नंबरची लाल रंगाची स्विफ्ट कार काळ्या काचा आणि लहान अक्षरात नंबर प्लेटसह आढळून आली. चालकाला थांबवूनही तो न थांबता पळ काढल्याने माळेगाव पोलिसांच्या मदतीने ही कार ताब्यात घेण्यात आली.
तसेच (एम.एच.४२ बी.एच.६६८९) या नंबरची बुलेट गेल्या दीड वर्षांपासून चुकीच्या नंबर प्लेटसह आणि मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरसह फिरत असल्याचे निष्पन्न झाले. यावर करण्यात आलेला दंड इंदापूर तालुक्यातील एका टेम्पोवर जमा होत असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांकडून याचा मागोवा घेतला जात होता. अखेर ही गाडी ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत आणखी एका मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर असलेल्या यमाहा (एम.एच.४२ बी.आर.११२५) गाडीचाही समावेश होता. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही गाडी न थांबवल्यामुळे पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय (एम.एच.४२ बी.एल. ७२९४) ही स्प्लेंडर प्लस दुचाकी नंबर प्लेटशिवाय फिरताना आढळून आली. हे सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आलेली आहेत. यासह इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, पोलीस अंमलदार प्रदिप काळे, सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, सिमा घुले, रूपाली जमदाडे, माया निगडे, स्वाती काजळे, दत्तात्रय भोसले. आकाश कांबळे, प्रज्योज चव्हाण आणि शीघ्र कृती दलाचे १४ जवान यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह नियमशिस्तीच्या दृष्टीने ही पावले आवश्यक असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत. सुजाण नागरिकांनी कोणीही वाहतुकीचे नियम मोडत असल्यास ९९२३६३०६५२ या माझ्या क्रमांकावर वाहनाचा क्रमांक, फोटो अथवा व्हिडिओ पाठवावा. त्यावर कारवाई केली जाईल.