स्थानिक

बारामती नगरपालिकेत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा; कायदेशीर प्रबोधन आणि सक्षमीकरणावर भर

'महिला दिन' निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती नगरपालिकेत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा; कायदेशीर प्रबोधन आणि सक्षमीकरणावर भर

‘महिला दिन’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती वार्तापत्र 

११ मार्च २०२६ रोजी बारामती नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ‘महिला दिन’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या कायदेशीर हक्क, मानसिक आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि कायदेशीर हक्क
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. प्रिया गुजर-महाडिक यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते अजितदादा यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ‘कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धचा कायदा (POSH Act)’ आणि महिलांना मिळणाऱ्या इतर कायदेशीर संरक्षणाबद्दल सविस्तर माहिती दिली.

“नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, बदलत्या जीवनशैलीत महिलांचे ‘मानसिक आरोग्य’ कसे जपावे, यावरही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

महिला सक्षमीकरणासाठी नगरपालिकेचे धोरण
नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, “नगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात महिलांचे आरोग्य, रोजगार निर्मिती आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येईल.

” या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.मान्यवरांचे मनोगत कार्यक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता जाधव, उपनगराध्यक्षा सौ. श्वेता नाळे आणि सौ. वनिता सातकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.

कार्यक्रमातील उपस्थिती या कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसभापती रूपाली मलगुंडे यांनी केले.

या वेळी बारामती नगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे कर्मचारी आणि बारामती शहरातील विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Back to top button