पुरस्कारासाठी चित्रपट बनवू नका प्रा.संतोष पाठारे ; अनेकांत लघुपट महोत्सवात ‘केकी’ ठरला सर्वोत्तम, ‘उन्मेय’ ला व्दितिय पुरस्कार

पुरस्कारासाठी चित्रपट बनवू नका प्रा.संतोष पाठारे ; अनेकांत लघुपट महोत्सवात ‘केकी’ ठरला सर्वोत्तम, ‘उन्मेय’ ला व्दितिय पुरस्कार
रोख रक्कम असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बारामती वार्तापत्र
चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेऊन चित्रपट तयार केला पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी चित्रपट तयार करा. मला व्यक्त व्हायचे आहे, काहीतरी लोकांना सांगायचे आहे, दर्जेदार कलाकृती निर्माण करायची आहे या दृष्टिकोनातून चित्रपट तयार करा आणि तो कसा झाला आहे हे प्रेक्षक ठरवतील. केवळ कोणत्या स्पर्धेत पारितोषिक मिळवायचे आहे म्हणून चित्रपट बनवू नका असा सल्ला चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक लेखक प्रा. संतोष पाठारे यांनी दिला.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागातर्फे आयोजित पहिल्या अनेकांत राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक समारंभ शुक्रवारी (दि.१४ मार्च) रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाठारे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनेकांत एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य राहुल शाह, चंद्रवदन विद्याचंद्र शहा (मुंबईकर), उपप्राचार्य प्रा. डॉ. सचिन गाडेकर, डॉ. अरुण मगर, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. निरंजन शहा, कला शाखेच्या अधिष्ठाता डॉ सीमा नाईक- गोसावी, महोत्सव डायरेक्टर प्रा. राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाला प्रायोजकत्व दिल्याबद्दल सोहन इंडस्ट्रीजचे भारतबापू तावरे यांच्यावतीने संदीप तावरे यांचा तसेच विश्वास शंकरराव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
पहिल्या फेरीचे ज्युरी प्रा. डॉ. अजय ढवळे, स्वरूप गायकवाड यांनाही यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम लघुपटांच्या दिग्दर्शकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , रोख रक्कम असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लेखक, दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी स्पर्धेचे दुसरे परीक्षक म्हणून काम पहिले .
राहुल शाह म्हणाले, अनेकांत राष्ट्रीय लघुपट महोत्सव बारामतीत आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदा पार पडला. सर्व लघुपट विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांना पुढील वर्षी संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पाठारे म्हणाले, इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झालेल्या कलाकृतींमधून दिग्दर्शकाकडून प्रेरणा घ्या मात्र त्याच पद्धतीचे काम करणे टाळा. आशय हा कायम चित्रपटाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे यासह तांत्रिकदृष्ट्या तो कसा उत्तम बनवावा याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणतीही कलाकृती परिपूर्ण नसते.
महोत्सवात सहभाग घेतलेल्या खिचडीभात लघुपटाचे दिग्दर्शक प्रवीण खाडे यांनी बारामती मध्ये जसे मुरब्बी राजकीय नेते घडले आहेत त्या प्रमाणेच चित्रपट निर्माते घडावेत असा आशावाद व्यक्त केला. तर अंकुर या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन धुळधर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गुरुवारी दि. १२ मार्च रोजी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), खजिनदार विकासभाई लेंगरेकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. महोत्सवात दोन दिवसात पहिल्या फेरीतून निवडलेले उत्कृष्ट ३५ लघुपट दाखविण्यात आले.
समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचे स्वागत उपप्राचार्य प्रा.डॉ. सचिन गाडेकर यांनी केले, प्रास्ताविक महोत्सवाचे संचालक प्रा. राहुल चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनंदा शेळके आणि प्रा. डॉ. सुनील खामगळ यांनी केले तर आभार उपप्राचार्य अरुण मगर यांनी व्यक्त केले.
——————
मोबाईलवर चित्रपट पाहणे गुन्हा मोबाईल वर चित्रपट पाहणे गुन्हा आहे असे मी मानतो. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला पाहिजे. ओटीटी वर आल्यास पाहू युट्यूब वर फिल्म पाहू असा दृष्टिकोण सोडा. चांगला सिनेमा पाहत रहा. पाटी कोरी ठेऊन जा. सर्वात महत्वाचे म्हणजे आवडला नाही तर समाजमाध्यमावर व्यक्त होऊ नका. दिग्दर्शक, निर्मात्यांनी कष्ट मेहनत घेण्यासह आर्थिक गुंतवणूक केलेली असते असेही चित्रपट दिग्दर्शक संतोष पाठारे यांनी सांगितले.
पारितोषिक
उत्कृष्ट शॉर्ट फिल्म –
पाहिले पारितोषिक – शॉर्ट फिल्म: केकी – डायरेक्टर: तुषार उडेग.
द्वितीय पारितोषिक – शॉर्ट फिल्म: उन्मेय – डायरेक्टर: निशित हिवरकर.
तृतीय पारितोषिक – शॉर्ट फिल्म: डंप यार्ड – डायरेक्टर: निखिल शिंदे.
वयक्तिक अवॉर्ड-
बेस्ट रायटिंग – रायटर्स: आनंद पांडे व राजकुमार तांगडे – शॉर्ट फिल्म: हरवले आहेत ६ डिसेंबर १९५६ पासून.
बेस्ट डायरेक्शन – डायरेक्टर: प्रवीण अजिनाथ खाडे – शॉर्ट फिल्म: खिचडी भात.
बेस्ट सिनेमॅटोग्राफी – सिनेमॅटोग्राफर: प्रथमेश रांगोळे – शॉर्ट फिल्म: केकी
बेस्ट एडिटिंग- एडिटर: किरण ओत्तूर- शॉर्ट फिल्म: चिकन करी
स्पेशल ज्यूरी मेन्शन अवॉर्ड-
१)स्पेशल ज्यूरी मेन्शन फॉर साउंड डिज़ाइनिंग – साउंड डिज़ाइनर: देवेश कमसे – शॉर्ट फिल्म: उन्मेय.
२)स्पेशल ज्युरी मेन्शन फिल्म – शॉर्ट फिल्म: थुनाई
डायरेक्टर: विघ्नेश परमसिवम – प्रोड्यूसर: आनंद वरदराज .
३) स्पेशल ज्युरी मेन्शन फिल्म – शॉर्ट फिल्म: मीरा- डायरेक्टर आणि प्रोड्यूसर: चैतन्य बडवे.
४) स्पेशल ज्युरी मेन्शन फिल्म – शॉर्ट फिल्म: अंकुर – डायरेक्टर आणि प्रोड्यूसर: मोहन धुळधर.






