बारामतीत काँग्रेसच्या आकाश मोरेंची माघार, जय अजित पवारांनी मानले आभार
काँग्रेस यांनी खूप चांगला निर्णय घेतला

बारामतीत काँग्रेसच्या आकाश मोरेंची माघार, जय अजित पवारांनी मानले आभार
काँग्रेस यांनी खूप चांगला निर्णय घेतला
बारामती वार्तापत्र
बारामती पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.
त्यामुळे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, लोकशाहीत निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे, अशी भूमिका मांडलेल्या काँग्रेसने आकाश मोरेंना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले. मात्र, गुरुवारी (ता. 9 एप्रिल) अखेरीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीतून त्यांचा उमेदवार माघार घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता जय पवार यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत.
काँग्रेसचे बारामती पोटनिवडणुकीचे उमेदवार आकाश मोरेंनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घोषणा करताच आपला अर्ज मागे घेतला. यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काँग्रेसचे आभार मानले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, आम्हाला सर्वांना आधीपासून ही निवडणूक बिनविरोध हवी होती. आकाश मोरेही आता आपल्यासोबत आहेत. त्यांनी आणि त्यांचा पक्ष काँग्रेस यांनी खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण, आपण सर्व ही निवडणूक दादांसाठी लढत आहोत. दादांनी अनेक दशके खूप काम केले, त्यांनी खूप विकासकामे केली. दादांनी सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन काम केले. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते, तेव्हा आपले सरकार होते. आता महायुतीचे सरकार आहे. मात्र मला वाटते की सर्वच पक्षातील वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला आहे. हीच दादांना खरी आदरांजली असल्याने मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो, असे जय पवारांनी म्हटले.
तसेच, आता कालपासून आम्ही सर्व उमेदवारांना भेटत आहोत. जितके फॉर्म माघारी घेऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, उमेदवारांची ज्या काही मागण्या होत्या, जशा की आम्हाला हे काम करून पाहिजे आहे किंवा अन्य कोणतीही मदत पाहिजे, ते करून दिले आहे. तर ज्यांनी उमेदवारी अर्ज माघारी नाही घेतले, त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना आम्ही काय बोलू शकतो. मात्र, काँग्रेसच्या आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बरं वाटल्याची भावना जय पवारांनी व्यक्त केली.





