बारामतीत हातभट्टी दारू धंद्यांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका
धडक छापेमारीत हातभट्टी दारू नष्ट; पोलिसांचा कडक इशारा

बारामतीत हातभट्टी दारू धंद्यांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका
धडक छापेमारीत हातभट्टी दारू नष्ट; पोलिसांचा कडक इशारा
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून सलग कारवायांमुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई राबविण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुणवडी, बांदलवाडी, आमराई व आसपासच्या परिसरात एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य, भांडी, ड्रम तसेच तयार दारू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेली दारू व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले, ज्यामुळे अवैध धंद्यावर तात्काळ आळा बसला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी लपूनछपून हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच ही मोहीम आखण्यात आली होती. या कारवाईत अनेक ठिकाणी अवैध दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता पोलिसांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत जनजागृती उपक्रमही राबवला. गावोगावी जाऊन नागरिकांना दारूबंदी कायद्याची माहिती देण्यात आली. विशेषतः महिला वर्गाशी संवाद साधत अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. अवैध दारूमुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम, कुटुंबातील तणाव आणि सामाजिक नुकसान याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले की, “अवैध दारू विक्रीविरोधातील ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. कुठेही अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”
या धडक कारवाईमुळे गुणवडी व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अवैध धंद्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामती शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.






