बारामतीत मेंढपाळांवरील हल्ला निंदनीय; आरोपींना सोडणार नाही – चित्रा वाघ यांचा संताप
एका 60 वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची तीव्र खंत

बारामतीत मेंढपाळांवरील हल्ला निंदनीय; आरोपींना सोडणार नाही – चित्रा वाघ यांचा संताप
एका 60 वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची तीव्र खंत
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वरकटणे येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेनंतर आज भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी जखमी मेंढपाळांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्परतेने अटक केली असून, एकाही आरोपीला सरकार सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“माणसाने माणसाशी कसे वागायचे हे सरकारने शिकवायचे का?” असा संतप्त सवाल करत, एका 60 वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींना जेरबंद केले असून, या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी चांगले काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा माणुसकीचा प्रश्न असल्याचे सांगत, समाजात नीतिमत्ता राहिली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जखमी महिलेची तब्येत विचारपूस करण्यासाठी आपण भेट दिल्याचे सांगत, आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि कुणालाही सोडले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला.






