बारामतीतील अनधिकृत होर्डिंग्जमागील नेमके ‘राजकीय आशीर्वाद’ कोणाचे?कारवाई होणार का?
अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा अनेक ठिकाणी नव्याने लोखंडी स्ट्रक्चर उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.

बारामतीतील अनधिकृत होर्डिंग्जमागील नेमके ‘राजकीय आशीर्वाद’ कोणाचे?कारवाई होणार का?
अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा अनेक ठिकाणी नव्याने लोखंडी स्ट्रक्चर उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहराच्या सौंदर्यीकरणाचा आणि शिस्तबद्ध विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिरंगा सर्कलच्या उद्घाटनावेळी बारामती नगर परिषद तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या होत्या की, शहरात अनधिकृत होर्डिंग्ज उभे करून बारामतीचे विद्रूपीकरण होऊ देऊ नका. मात्र त्यांच्या निधनानंतर या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे.
पुण्यात घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्जविरोधात मोहीम राबवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेनेही शहरातील अनेक बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि स्ट्रक्चर हटवण्याची कारवाई केली होती. त्या वेळी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि व्यापारी भागांमधील मोठमोठी जाहिरात फलक हटवण्यात आल्याने बारामतीचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा अनेक ठिकाणी नव्याने लोखंडी स्ट्रक्चर उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मोठ्या आकाराचे जाहिरात फलक लावण्यात आले असून, शहराच्या नियोजनावर आणि सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, हे होर्डिंग्ज कोणाच्या परवानगीने उभे राहत आहेत, त्यामागे कोणत्या बड्या राजकीय नेत्याचे किंवा स्थानिक नगरसेवकांचे पाठबळ आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे म्हणणे आहे की, बारामती ही नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जमुळे केवळ शहराचे विद्रूपीकरण होत नाही, तर वाहतूक सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी मोठे फलक रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः दिलेल्या सूचनांचा विसर प्रशासनाला पडला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना दुसऱ्या बाजूला अनधिकृत होर्डिंग्जना पुन्हा खतपाणी घातले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आता बारामती नगर परिषद आणि संबंधित प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, तसेच अनधिकृत होर्डिंग्जमागील नेमके ‘राजकीय आशीर्वाद’ कोणाचे आहेत, याबाबत कारवाई होणार का, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






