‘मला वाचवा’,आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने बारामतीतील नीर कॅनलमध्ये उडी मारली अन्;धाडसी युवकांनी दिले नवजीवन
नीरा कॅनलमध्ये उडी मारलेल्या तरुणीचे प्राण वाचले; बारामतीकरांकडून धाडसाला सलाम

‘मला वाचवा’,आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने बारामतीतील नीर कॅनलमध्ये उडी मारली अन्;धाडसी युवकांनी दिले नवजीवन
नीरा कॅनलमध्ये उडी मारलेल्या तरुणीचे प्राण वाचले; बारामतीकरांकडून धाडसाला सलाम
बारामती वार्तापत्र
बारामती काही क्षणांचा विलंब झाला असता तर अनर्थ अटळ होता. नीरा कॅनलच्या वेगवान पाण्यात एका तरुणीने उडी घेतल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृत्यूच्या दाराशी पोहोचलेल्या त्या तरुणीला दोन धाडसी युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवले आणि अक्षरशः नवजीवन दिले. या साहसी घटनेमुळे बारामती परिसरात या युवकांचे कौतुक होत आहे.
विवारी दुपारच्या सुमारास शहरातील क्रीडा संकुलासमोरील नीरा कॅनल परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. अचानक एका तरुणीने वाहत्या कॅनलमध्ये उडी घेतल्याचे लक्षात येताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आणि प्रवाहाचा वेगही प्रचंड असल्याने काही क्षणांसाठी सर्वजण हतबल झाले.
याच वेळी शिवराज शरद झांबरे आणि प्रेम अभिजीत काळे या युवकांनी प्रसंगावधान राखत धाडसी निर्णय घेतला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट कॅनलमध्ये उडी घेतली. जीवघेण्या प्रवाहाशी झुंज देत दोघांनी तरुणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग, खोली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हा प्रयत्न अत्यंत धोकादायक होता.
मात्र धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर दोघांनीही तरुणीला पकडून सुरक्षितपणे बाहेर आणले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. या बचावकार्यात नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतीचा हात दिला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि एका कुटुंबाचा आधार वाचला.
———–
एका उडीने मृत्यूला हरवले…
नीरा कॅनलच्या वेगवान पाण्यात जीव धोक्यात असताना शिवराज शरद झांबरे आणि प्रेम अभिजीत काळे युवकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे एका तरुणीला नवजीवन मिळाले. त्यांच्या या साहसी कृतीने माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव बारामतीकरांना पुन्हा एकदा करून दिली आहे. आज परिसरात एकच चर्चा आहे— “त्या दोन युवकांनी धाडस केले नसते, तर काय झाले असते?”






