राजकीय

ऑडिओ क्लिप, गुन्हा आणि राजीनाम्याची मागणी; किशोर मासाळ प्रकरणाने बारामतीचे राजकारण ढवळून निघाले

मासाळ प्रकरणात पक्ष नेतृत्वाला राजीनामा घेण्यात तांत्रिक व कायदेशीर अडचण ?

ऑडिओ क्लिप, गुन्हा आणि राजीनाम्याची मागणी; किशोर मासाळ प्रकरणाने बारामतीचे राजकारण ढवळून निघाले

मासाळ प्रकरणात पक्ष नेतृत्वाला राजीनामा घेण्यात तांत्रिक व कायदेशीर अडचण ?

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरोधातील वाद आता अधिकच गडद होताना दिसत आहे. एका बाजूला विनयभंगासह विविध गंभीर आरोपांप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून शहर पक्ष कार्यालयात यासंदर्भात बैठकही झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र मासाळ प्रकरणात पक्ष नेतृत्वाला राजीनामा घेण्यात तांत्रिक व कायदेशीर अडचण असल्याची चर्चा सुरु झाली आहे. किशोर मासाळ याला वाचविण्यासाठी काही नगरसेवक वकिलांची फौज उभी करणार असल्याची चर्चा आहे. राजीनाम्याच्या मागणीमुळे पक्षांतर्गत चर्चांनाही उधाण आले आहे.

दिवंगत अजितदादा पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा, “कोणी चुकीचे वागले तर त्याचा राजीनामा माझ्याकडे आधीच असतो,” असे सांगत असत.

मात्र यावेळी संबंधित नगरसेवकाचा राजीनामा पक्षाकडे नसल्याची चर्चा सुरू असून पक्ष संघटनेतील कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या संभाषणात एका महिलेशी बोलताना बारामतीतील एका नेत्याने “अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही… रूपालीताई मेली पाहिजे…” अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.

ही क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नगरसेवक किशोर मासाळ यांची असल्याची कुजबूज बारामतीत सुरू असली, तरी या ऑडिओ क्लिपची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

याचदरम्यान ३० मे रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर मासाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, विधवा महिलेचा छळ करणे, तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे तसेच काही उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आणखी भर म्हणजे मासाळ यांचा एक कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भावनिक स्वरात, “मला एकदा फोन करून बोल… मी तुझ्या आयुष्यातून जात आहे… मी रेल्वेच्या लाईनवर आहे… दहा वाजता माझी मान कापून घेतो… मला तुझी माफी मागून मरायचं आहे,” असे म्हणताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

मात्र हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे, त्यामागील संदर्भ काय आहे आणि तो कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

एकूणच, गुन्हा दाखल होणे, कथित ऑडिओ क्लिप, व्हायरल व्हिडिओ आणि राजीनाम्याची मागणी या सर्व घटनांमुळे बारामतीचे राजकारण ढवळून निघाले असून आगामी काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button