पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड; भर रस्त्यातून फिरवत दाखवला कायद्याचा धाक
गरदडे कॉम्प्लेक्स समोर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीवर यवत पोलिसांची कठोर कारवाई; १८ जणांवर गुन्हे, १० आरोपी अटकेत

पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड; भर रस्त्यातून फिरवत दाखवला कायद्याचा धाक
गरदडे कॉम्प्लेक्स समोर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीवर यवत पोलिसांची कठोर कारवाई; १८ जणांवर गुन्हे, १० आरोपी अटकेत
पाटस; प्रतिनिधि
दौंड तालुक्यातील पाटस येथे गरदडे कॉम्प्लेक्ससमोर भरदिवसा गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरोधात यवत पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक केलेल्या आरोपींची भर रस्त्यातून धिंड काढली.
या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर यवत पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणात एकूण १८ संशयित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्यापैकी १० संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना घटनास्थळ परिसरासह मुख्य रस्त्यांवरून फिरवण्यात आले.
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या धिंडीची परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. यवत पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





