राजकीय

अजित पवारांवरील कथित वक्तव्य भोवले; किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून तात्काळ हकालपट्टी

“ज्या अजित पवारांमुळे त्या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली

अजित पवारांवरील कथित वक्तव्य भोवले; किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून तात्काळ हकालपट्टी

“ज्या अजित पवारांमुळे त्या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली

बारामती वार्तापत्र 

कथित व्हायरल ऑडिओ क्लिप, महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, “बारामतीमधील एका नगरसेवकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित नगरसेवकाने केलेले कथित वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे.”

तटकरे यांनी किशोर मासाळ यांच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “ज्या अजित पवारांमुळे त्या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली, त्यांच्या पाठबळामुळेच ते बारामती नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक झाले. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी होती,” असे तटकरे म्हणाले.

“या सर्व प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने किशोर मासाळ यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी स्पष्ट घोषणा तटकरे यांनी केली.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार आणि रूपाली पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

तसेच एका महिलेच्या तक्रारीवरून मासाळ यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

विशेष म्हणजे, काही तासांपूर्वीच किशोर मासाळ यांनी हा विषय वैयक्तिक असल्याचे सांगत राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर पक्ष नेतृत्वाने थेट हकालपट्टीची कारवाई करत कठोर भूमिका घेतल्याने बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Back to top button