लोकशाहीच्या मुद्द्यावर बारामतीत युवक एकवटले बारामतीत दिल्लीतील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ जनआंदोलन
मुंबईच्या अनुष्का ढवळे यांच्या पुढाकार

लोकशाहीच्या मुद्द्यावर बारामतीत युवक एकवटले
बारामतीत दिल्लीतील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ जनआंदोलन
मुंबईच्या अनुष्का ढवळे यांच्या पुढाकार
बारामती वार्तापत्र
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ बारामतीत मंगळवारी (दि.२१) जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करत मुंबईतील अनुष्का ढवळे या तरुणीने आंदोलनाची हाक दिली. त्यांच्या या आवाहनाला बारामतीतील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आंदोलनाचे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर बारामतीमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. याच दरम्यान अनुष्का ढवळे बारामतीत आल्या. स्थानिक युवकांशी संवाद साधताना त्यांनी, “एवढे जागरूक नागरिक आणि युवक बारामतीत आहेत.
देशाच्या भविष्यासाठी, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन उपयोग नाही; रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने भूमिका मांडली पाहिजे,” अशी भूमिका मांडली. त्यांच्या या आवाहनानंतर काही युवकांनी तातडीने बैठक घेत आंदोलनाचे नियोजन सुरू केले.
आंदोलन कायदेशीर चौकटीत आणि शांततेत पार पडावे यासाठी आयोजकांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला ई-मेलद्वारे निवेदन सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारीही आयोजकांनी स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
बारामती एमआयडीसी येथील चौकात हे जनआंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलक यांनी “लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र या”, “विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध”, “लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.






