आपला जिल्हा

आरोग्यसेवेचा लोकाभिमुख उपक्रम; इंदापुरात रविवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर 

इंदापुरात एकाच छताखाली आरोग्यसेवा; मोफत तपासणी, शस्त्रक्रिया आणि शासकीय योजनांचा लाभ

आरोग्यसेवेचा लोकाभिमुख उपक्रम; इंदापुरात रविवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर 

इंदापुरात एकाच छताखाली आरोग्यसेवा; मोफत तपासणी, शस्त्रक्रिया आणि शासकीय योजनांचा लाभ

इंदापूर, आदित्य बोराटे – 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२६) शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून, राज्यातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर विविध विभागांमध्ये रुग्णांची तपासणी करणार आहेत. केवळ आरोग्य तपासणीच नव्हे, तर पात्र रुग्णांवर आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत.

या शिबिरात हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, नेत्ररोग, दंतचिकित्सा, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, अस्थिरोग, बालरोग तसेच लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. याशिवाय अपंग व्यक्तींना मोफत जयपूर फूट वाटप, मोफत रक्त तपासण्या, रक्तदान शिबिर, विविध प्रकारच्या थेरपी, श्रवण क्षमता तपासणी, स्पीच थेरपी मार्गदर्शन तसेच रेडिओलॉजी विभागामार्फत माफक दरात तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरात आरोग्यसेवांसह आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच रेशन कार्ड दुरुस्ती यांसारख्या शासकीय योजनांचा लाभही नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती व सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने हे शिबिर सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_