बारामती तालुक्यात खळबळ! पारधी समाजातील कर्तृत्ववान महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत; पती अटकेत
वैवाहिक छळाच्या आरोपांनी खळबळ; पतीला अटक, बारामती तालुका सुन्न

बारामती तालुक्यात खळबळ! पारधी समाजातील कर्तृत्ववान महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत; पती अटकेत
वैवाहिक छळाच्या आरोपांनी खळबळ; पतीला अटक, बारामती तालुका सुन्न
बारामती/डोंबिवली :
ज्या समाजातील मुलींना शिक्षणाची आणि सरकारी नोकरीची स्वप्ने पाहणेही कधीकाळी कठीण होते, त्याच पारधी समाजातून संघर्ष करत पोलीस दलात प्रवेश करून अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) यांच्या दुर्दैवी निधनाने बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वतःच्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर संगीता यांनी पोलीस दलात प्रवेश केला. त्यांच्या या यशामुळे पारधी समाजातील अनेक मुलींना नवी दिशा मिळाली. एका संगीतेला पाहून पाच-सहा मुलींनी पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे संगीता यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता, तर तो समाजातील पुढच्या पिढीला उभारी देणारा ठरला.
मात्र, डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरातील त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेने या प्रेरणादायी प्रवासाला वेदनादायी वळण मिळाले आहे.
पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप
नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगीता यांना पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नीच्या रंगावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्यातून वाद व मारहाण करणे तसेच घरातील वस्तूंच्या खरेदीवरूनही वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या त्रासामुळे संगीता यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी पती किरण भानुदास भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सासरच्या इतर मंडळींकडून पैशांची मागणी आणि छळ झाल्याचेही नातेवाईकांचे आरोप असून, संबंधितांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायाच्या मागणीसाठी पार्थिव पोलीस ठाण्यासमोर
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संगीता यांचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर आणून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर सोमेश्वर मंदिर परिसरातील शेतात अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती आहे.
ज्यांनी पतीला पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केले, त्यांच्याच आयुष्याचा असा शेवट…
संगीता यांच्या आयुष्यातील आणखी एक बाब या घटनेला अधिक वेदनादायी बनवते. ज्या पतीला त्यांनी पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केले, त्यालाही पोलीस दलात दाखल होण्यासाठी त्यांनी मदत केली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
स्वतः पोलीस बनून त्यांनी समाजातील मुलींना शिक्षण, स्वावलंबन आणि सरकारी नोकरीची वाट दाखवली. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक मुलींना आत्मविश्वास मिळाला. मात्र, त्याच संगीता यांच्या निधनाने आज त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला आहे.
संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका लेकीने अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली; पण तिच्याच आयुष्यातील वेदना अखेर कुठपर्यंत पोहोचल्या, हा प्रश्न या घटनेनंतर समाजासमोर उभा राहिला आहे.
संगीता यांच्या निधनाची घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, वैवाहिक नात्यांमधील मानसिक छळ, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि समाजातील मुलींना स्वावलंबी करण्याच्या गरजेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.






