राजकीय

अजित पवारांच्या अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी राष्ट्रवादीला सवाल; ‘४० आमदार, ९ मंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही’

‘अजूनही गुन्हा दाखल नाही, तपासाची स्थिती आम्हाला माहिती नाही’

अजित पवारांच्या अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी राष्ट्रवादीला सवाल; ‘४० आमदार, ९ मंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही’

‘अजूनही गुन्हा दाखल नाही, तपासाची स्थिती आम्हाला माहिती नाही’

ठाणे | प्रतिनिधी

भाऊ माझा गेला, एवढा मोठा विमान अपघात झाला; मात्र सत्तेत असलेल्या ४० आमदार आणि ९ मंत्र्यांनी अद्याप याबाबत एक शब्दही काढलेला नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून खंत व्यक्त केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असली, तरी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ‘अजित पवार गटाच्या ४० आमदारांनी आणि ९ मंत्र्यांनी एफआयआर किंवा चौकशीबाबत कधी एक शब्द तरी काढला आहे का?’, असा सवाल त्यांनी केला.

अमित ठाकरेंच्या गुन्ह्याचा दाखला

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा संदर्भ दिला.

एक फोटो हटवला म्हणून दोन तासांत गुन्हा दाखल होतो; पण माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला, त्यात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

‘माझ्या भावाच्या तपासाची स्थिती काय?’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मनसे आणि भाजपाने एकमेकांशी लढायचे की नाही, हा त्यांचा विषय आहे. मात्र, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाची नेमकी स्थिती काय आहे, हे अजूनही आम्हाला माहिती नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Back to top button