माळेगाव साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा; ड्रोनद्वारे औषध फवारणीची सुविधा!
शेंडाअळी, पायरीला व इतर रोग-किडींचा प्रादुर्भाव; प्रति एकरी फक्त ४५० रुपयांत ड्रोन फवारणी

🚁 माळेगाव साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा; ड्रोनद्वारे औषध फवारणीची सुविधा!
शेंडाअळी, पायरीला व इतर रोग-किडींचा प्रादुर्भाव; प्रति एकरी फक्त ४५० रुपयांत ड्रोन फवारणी
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी कारखाना प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी नोंदवलेल्या मोठ्या क्षेत्रावरील उसामध्ये शेंडाअळी, पायरीला व इतर रोग-किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत असल्याने ड्रोनद्वारे औषध फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारखान्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सध्या शेतमजुरांच्या उपलब्धतेची अडचण लक्षात घेता ड्रोनद्वारे फवारणी करणे निश्चितच किफायतशीर ठरणार आहे. या फवारणीसाठी लागणारी औषधे सभासदांनी स्वतः खरेदी करावयाची असून, फवारणीसाठी आवश्यक ड्रोन कारखान्यामार्फत उधारीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विशेष म्हणजे, ड्रोन फवारणीचा खर्च प्रति एकर ४५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. फवारणीचा खर्च संबंधित सभासदांच्या कपात येणाऱ्या ऊस बिलातून वसूल केला जाणार असल्याचे कारखान्याने स्पष्ट केले आहे.
ड्रोनद्वारे फवारणीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांनी ऊस विकास विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे.
📌 ड्रोन फवारणीसाठी कारखान्याचे आवाहन
ऊस पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी सभासदांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या प्रशासनाने केले आहे.
ड्रोन फवारणीचा खर्च : ₹४५० प्रति एकर
औषधे : सभासदांनी स्वतः खरेदी करायची
फवारणीचे ड्रोन : कारखान्यामार्फत उपलब्ध
खर्चाची वसुली : ऊस बिलातून
संदर्भ : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे दि. ०३/०९/२०२६ रोजीचे परिपत्रक.






