‘माझ्या मुलांपेक्षा आणि माझ्यापेक्षा दादांचं दुःख कुणाला जास्त?’; सुनेत्रा पवारांचा सवाल
‘सतत मीडियात येणं म्हणजे अपडेट मिळणं नाही!’

‘माझ्या मुलांपेक्षा आणि माझ्यापेक्षा दादांचं दुःख कुणाला जास्त?’; सुनेत्रा पवारांचा सवाल
‘सतत मीडियात येणं म्हणजे अपडेट मिळणं नाही!’
बारामती वार्तापत्र
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघाताच्या चौकशीवरून सुरू असलेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली. “आदरणीय अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे, हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार? त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका,” असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
‘ठोस निर्णय झाला पाहिजे, आम्हीही प्रयत्नशील’
अजितदादांच्या अपघातानंतर या प्रकरणात ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी सर्वांचीच भावना आहे. त्यादृष्टीने आम्हीही प्रयत्न करत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आलो आहोत, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिला असून तो शब्द पाळण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत. संबंधित तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. “माझा तपास यंत्रणांवर, कायद्यावर आणि संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनाही आपण वेळ दिला पाहिजे,” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
‘सतत मीडिया कव्हरेज म्हणजे अपडेट मिळणे नाही!’
अजित पवार यांच्या अपघाताबाबत माध्यमांमध्ये सातत्याने होणाऱ्या चर्चेवरही सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “सतत मीडियामध्ये येणं म्हणजेच अपडेट मिळणं नाही. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का, अशी शंका वाटते,” असे त्या म्हणाल्या.
अजितदादांची आई, त्यांची मुलं आणि आपण यांच्यापेक्षा या दुःखाची तीव्रता कुणाला अधिक असू शकते, याचा विचार सर्वांनी करायला हवा, असेही त्यांनी भावूक होत स्पष्ट केले.






