बारामती हादरली! 16 वर्षीय विद्यार्थिनीचा टेरेसवरून पडून मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू
CCTV, डिजिटल माहिती अन् जबाबांची पोलिसांकडून पडताळणी

बारामती हादरली! 16 वर्षीय विद्यार्थिनीचा टेरेसवरून पडून मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू
CCTV, डिजिटल माहिती अन् जबाबांची पोलिसांकडून पडताळणी.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात शुक्रवारी (दि. 4 सप्टेंबर) पहाटे एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून 16 वर्षीय विद्यार्थिनी खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
सदर विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास आणि परीक्षेच्या ताणाबाबत आई-वडिलांशी बोलत होती. अभ्यास होत नसल्याने तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे ती सांगत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, विद्यार्थिनी रात्री सुमारे 12.30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील वर गेले असता ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी आवाज दिल्यानंतर तिने अचानक खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
घटनेनंतर पालक व शेजाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान काही काळ ती शुद्धीवर होती, अशी माहिती पालकांनी दिली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पालकांनी सध्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार अथवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण हे प्राथमिक कारण पालकांकडून सांगण्यात आले असले, तरी पोलिसांकडून वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक तसेच अन्य सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
या विद्यार्थिनीबाबत यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद पोलिसांकडे झाल्याची माहिती समोर आली असून, त्या प्रकरणातील कागदपत्रे व तपासातील बाबींचीही सद्य घटनेच्या अनुषंगाने पडताळणी केली जात आहे.
घटनास्थळाची पाहणी, पंचनामा, CCTV फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, उपलब्ध डिजिटल माहिती तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी आणि शिक्षकांचे जबाब घेऊन बारामती शहर पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीची ओळख पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे. नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.






