बदलत्या शिक्षणप्रवाहांची नवी दिशा; बारामतीत रयत गुरुकुल 2.0चे मंथन
२८ शाळांचे मुख्याध्यापक-शिक्षक एकत्र

बदलत्या शिक्षणप्रवाहांची नवी दिशा; बारामतीत रयत गुरुकुल 2.0चे मंथन
२८ शाळांचे मुख्याध्यापक-शिक्षक एकत्र
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत **‘रयत गुरुकुल प्रकल्प 2.0’**च्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन बारामती येथील राधेश्याम आर. एन. अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग, पुणे अंतर्गत पुणे, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील २८ शाळांचे मुख्याध्यापक, गुरुकुल प्रमुख, गुरुकुल सहाय्यक, गुरुकुल समन्वयक तसेच तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेस उपस्थित होते.
कार्यशाळेस रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे चेअरमन व संस्थेचे संघटक अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत होत असलेल्या विविध शैक्षणिक बदलांविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षकांनी आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःमध्ये तसेच अध्यापन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी यांनी रयत गुरुकुल प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या विविध पैलूंवर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
यावेळी समन्वय समिती सदस्य सदाशिव (बापू) सातव, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, गुरुकुल प्रकल्प प्रमुख ए. के. निकम, जनरल बॉडी सदस्य ए. बी. गायकवाड, प्राचार्य सतीश पाचपुते, गणपतराव तावरे, पर्यवेक्षिका अलका चौधर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अधिकारी संजय मोहिते यांनी केले. त्यांनी रयत गुरुकुल प्रकल्प 2.0ची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विभागीय स्तरावरील अंमलबजावणीची माहिती दिली. सूत्रसंचालन विकास जाधव व मनीषा रुपनवर यांनी केले, तर उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार प्राचार्य सतीश पाचपुते यांनी मानले.
आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प या कार्यशाळेत करण्यात आला.






