क्राईम रिपोर्ट

बारामती पोलिसांचा कडक इशारा—‘दहशत किंवा वर्चस्वाला शहरात थारा नाही!’,तिघांवर गुन्हा

भरधाव वाहनातून धाक दाखवल्याचा आरोप

बारामती पोलिसांचा कडक इशारा—‘दहशत किंवा वर्चस्वाला शहरात थारा नाही!’,तिघांवर गुन्हा

भरधाव वाहनातून धाक दाखवल्याचा आरोप.

बारामती वार्तापत्र

इंदापूर चौकातील प्रकार; वाहनाच्या टपावर बसून व खिडकीतून शरीर बाहेर काढून हातवारे केल्याचा आरोप; किशोर ढोरेच्या पूर्व गुन्हेगारी रेकॉर्डचीही छाननी

बारामती, दि. ६ सप्टेंबर २०२६ :
बारामती शहरातील सार्वजनिक ठिकाणी भरधाव वाहन चालवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या प्रकाराची बारामती शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत तत्काळ कारवाई केली आहे. इंदापूर चौक परिसरात धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवून इतर वाहनांना अचानक कट मारणे, धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे तसेच वाहनाच्या टपावर आणि खिडकीतून शरीर बाहेर काढून नागरिकांकडे हातवारे केल्याचा प्रकार समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४२ बीएन १०९५ इंदापूर चौक परिसरातून भरधाव वेगाने नेण्यात आले. या प्रकारामुळे काही नागरिकांनी सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला जाणे पसंत केले, तर काही वाहनचालकांना आपली वाहने बाजूला घेऊन थांबावे लागले.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, २८५ तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात योगेश बापू लोंढे, किशोर संजय ढोरे उर्फ मोठा डावर आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहनाची मालकी, कागदपत्रे आणि आरोपींच्या ताब्यात वाहन कसे आले याची चौकशी सुरू आहे.

🔴 किशोर ढोरेच्या पूर्वइतिहासाची पोलिसांकडून छाननी

पोलिसांच्या अभिलेखानुसार किशोर संजय ढोरे उर्फ मोठा डावर याच्याविरुद्ध यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या पूर्व गुन्हेगारी इतिहासासह यापूर्वी झालेल्या प्रतिबंधक कारवाईचीही तपासणी केली जात आहे.

तो MCOCA प्रकरणातून जामिनावर बाहेर असल्याची बाब न्यायालयीन अभिलेखांच्या आधारे पडताळली जात असून, सद्य प्रकरणाचा जामीन अटींशी संबंध आढळल्यास कायद्यानुसार न्यायालयास अहवाल सादर करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

⚠️ ‘बारामतीत दहशतीला थारा नाही!’

सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, नागरिकांना धमकावणे किंवा टोळीच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पुरावे आणि कायदेशीर निकषांच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या धमकी, मारहाण, खंडणी, जबरदस्ती किंवा दहशतीला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा. तातडीच्या प्रसंगी डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button