स्थानिक

बारामती हिरवीगार करण्यासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; नगर परिषदेला २०० ट्री गार्डचे हस्तांतरण!

‘झाडे लावा, झाडे जगवा’ला कृतीची जोड;

बारामती हिरवीगार करण्यासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; नगर परिषदेला २०० ट्री गार्डचे हस्तांतरण!

‘झाडे लावा, झाडे जगवा’ला कृतीची जोड

बारामती वार्तापत्र 

शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासोबतच नव्याने लागवड करण्यात आलेल्या झाडांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने बारामती नगर परिषदेला २०० ट्री गार्डचे हस्तांतरण करण्यात आले. या हस्तांतरण समारंभाला युवा नेते जय अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील विविध भागांत वृक्षलागवड केल्यानंतर लहान रोपांचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जनावरे तसेच अन्य कारणांमुळे नव्याने लावलेल्या रोपांचे नुकसान होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब बारामतीने सामाजिक बांधिलकी जपत नगर परिषदेला २०० ट्री गार्ड उपलब्ध करून दिले.

या ट्री गार्डचा वापर नगर परिषदेमार्फत शहरातील विविध ठिकाणी लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीबरोबरच वृक्षसंवर्धनाला चालना मिळून बारामती शहर अधिक हिरवेगार करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असून, नागरिकांनीही वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे बारामतीच्या हरित शहराच्या संकल्पनेला निश्चितच हातभार लागणार आहे.

Back to top button