आपला जिल्हा

बारामती हॉस्पिटल संलग्न मेडिकलवर ‘FDA’ची धडक; औषधांचे नमुने ताब्यात, मेडिकल सील!

रुग्णांच्या जीवाशी खेळ नको!

बारामती हॉस्पिटल संलग्न मेडिकलवर ‘FDA’ची धडक; औषधांचे नमुने ताब्यात, मेडिकल सील!

रुग्णांच्या जीवाशी खेळ नको!

बारामती वार्तापत्र 

बारामती हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या बारामती मेडिकल दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केल्याने बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. FDAच्या पथकाने मेडिकलची तपासणी करून विविध औषधांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, त्यानंतर संबंधित मेडिकल दुकान सील करण्यात आल्याची माहिती आहे.

या कारवाईनंतर आता औषधांची गुणवत्ता, नियमांचे पालन आणि कारवाईमागील नेमके कारण काय? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ताब्यात घेतलेल्या औषधांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार असून, अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

मात्र, मेडिकल दुकान सील झाल्यानंतरही हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलच्या शेजारी टेबल लावून औषधविक्री सुरू असल्याचा दावा/चर्चा होत आहे. हा प्रकार नियमांच्या चौकटीत आहे का? सील केलेल्या मेडिकलच्या परिसरातून औषधविक्री करण्यास परवानगी आहे का? याची संबंधित यंत्रणा चौकशी करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे FDAने नेमकी कोणत्या कारणामुळे कारवाई केली, कोणती औषधे नमुन्यांसाठी ताब्यात घेतली आणि कारवाईनंतर औषधविक्रीबाबत काय नियम आहेत, याबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या औषधांशी आणि आरोग्याशी संबंधित विषय असल्याने कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा नियमभंग खपवून घेऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

आता FDAच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कारवाईचे खरे कारण काय? औषधांचे नमुने काय सांगणार? आणि मेडिकल सील असताना सुरू असल्याच्या कथित औषधविक्रीवर प्रशासन काय भूमिका घेणार? याची उत्तरे मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ नको; कारवाई झाली असेल तर ती ठोस आणि पारदर्शक हवी! अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Back to top button