आपला जिल्हा

नातवंडांसोबत पुन्हा फुलले आजी-आजोबांचे बालपण;शहा ग्लोबल स्कूलमध्ये गणपती मूर्ती निर्मितीत आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग

आज आम्ही पुन्हा आमचे बालपण अनुभवले..

नातवंडांसोबत पुन्हा फुलले आजी-आजोबांचे बालपण;शहा ग्लोबल स्कूलमध्ये गणपती मूर्ती निर्मितीत आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग

आज आम्ही पुन्हा आमचे बालपण अनुभवले..

इंदापूर :

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी होत चाललेला आजी-आजोबांचा सहवास आणि नातवंडांशी असलेली भावनिक नाळ अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने शहा ग्लोबल स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मनोरंजक खेळांसह नातवंडांसोबत गणपती मूर्ती निर्मितीचा आनंद घेताना आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर पुन्हा बालपण फुलल्याचे मनोहारी चित्र यावेळी पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांनी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आजी-आजोबांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. आजी-आजोबांच्या अनुभवातून, प्रेमातून आणि संस्कारातून पुढील पिढीला मिळणारा समृद्ध वारसा अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आजी-आजोबांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, पुस्तक संतुलन आदी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आजी-आजोबा आणि नातवंडांसाठी गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. मातीच्या गोळ्याला आकार देत नातवंडांसोबत आपल्या हातांनी गणपतीची मूर्ती साकारताना आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते.

या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना आजी-आजोबांनी, “आज आम्ही पुन्हा आमचे बालपण अनुभवले. कधी हातात माती घेतली नव्हती; मात्र नातवंडांसोबत गणपतीची मूर्ती साकारण्याचा आनंद मिळाला. हा सुंदर अनुभव दिल्याबद्दल शहा ग्लोबल स्कूलचे आभार,” अशा भावना व्यक्त केल्या.

शाळेच्या व्यवस्थापन सदस्या रुचिरा शहा यांनीही उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या उपक्रमाचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या प्रेमाची आणि अनुभवांची शाळेला नेहमीच साथ लाभावी, हीच अपेक्षा,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा मॅडम व राजश्री पाटील मॅडम यांनी केले, तर कल्याणी यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावट उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.

यावेळी शाळेच्या व्यवस्थापनातील मालती शहा, मुकुंद शहा, अंकिता शहा, अंगद शहा व रुचिरा शहा यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारांची नाळ अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

Back to top button