कृषी

७६ संशोधन लेख, १२ पुस्तके अन् २३ कृषी शिफारशी; डॉ. नांदगुडेंच्या कार्याचा राज्य शासनाकडून गौरव

IIT खरगपूर ते नेब्रास्का-लिंकन विद्यापीठ

७६ संशोधन लेख, १२ पुस्तके अन् २३ कृषी शिफारशी; डॉ. नांदगुडेंच्या कार्याचा राज्य शासनाकडून गौरव

IIT खरगपूर ते नेब्रास्का-लिंकन विद्यापीठ.

दापोली | प्रतिनिधी

कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन, अध्यापन, विद्यार्थी मार्गदर्शन आणि कृषी विकासातील योगदानाची दखल घेत डॉ. सचिनकुमार भगवान नांदगुडे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. नांदगुडे हे डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथे मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात त्यांना सुमारे २५ वर्षांचा अनुभव असून, या काळात त्यांनी विविध महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत.

IIT खरगपूरपासून अमेरिकेतील संशोधनापर्यंत

डॉ. नांदगुडे यांनी IIT खरगपूर येथून एम.टेक. आणि पीएच.डी. पूर्ण केली आहे. तसेच अमेरिकेतील नेब्रास्का-लिंकन विद्यापीठात पोस्ट-डॉक्टोरल संशोधन केले आहे. उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाचा अनुभव त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी उपयोगात आणला.

७६ संशोधन लेख, १२ पुस्तके; विद्यार्थ्यांनाही मोठे मार्गदर्शन

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पदव्युत्तर आणि ११ आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या नावावर ७६ संशोधन लेख, १२ प्रकाशित पुस्तके आणि पुस्तकांमधील ३ अध्याय आहेत.

तसेच त्यांनी ७ संशोधन प्रकल्पांचे मुख्य संशोधक आणि एका प्रकल्पाचे सहसंशोधक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या संशोधनातून २३ शिफारशी, वाण, कृषी यंत्रे व अवजारे विकसित अथवा प्रसारित करण्यात योगदान मिळाले आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही कार्याची दखल

डॉ. नांदगुडे यांना यापूर्वी ६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे नेतृत्व तसेच विविध परदेशी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत त्यांनी कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान दिले आहे.

त्यांच्या नावावर ३ कॉपीराईट आणि पेटंट असून, गोवा शासनाच्या कृषीविषयक बाबींवर तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नवसारी कृषी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक समित्यांमध्ये सदस्य म्हणून तसेच हवामान-स्मार्ट पाणलोट क्षेत्र संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापना व विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

डॉ. नांदगुडे यांच्या या यशाबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासह कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ’ पुरस्कारामुळे त्यांच्या दीर्घकालीन संशोधन कार्याला मोठी आणि अभिमानास्पद पावती मिळाली आहे.

Back to top button