तडजोडीतून हजारो वादांना पूर्णविराम! बारामती लोकअदालतीत ५,६२७ प्रकरणांचा निपटारा
अपघातग्रस्तांना मिळाला मोठा दिलासा

तडजोडीतून हजारो वादांना पूर्णविराम! बारामती लोकअदालतीत ५,६२७ प्रकरणांचा निपटारा
अपघातग्रस्तांना मिळाला मोठा दिलासा
बारामती वार्तापत्र
बारामती जिल्हा न्यायालयात शनिवारी (ता. १२) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी एकूण ५,६२७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल ६ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली विधी सेवा समिती आणि बारामती वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश एच. ए. वाणी, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश डी. एस. झंवर, सहदिवाणी न्यायाधीश पी. एम. पाटील, पी. पी. काळे आणि व्ही. व्ही. देशमुख यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
अपघातग्रस्तांना २ कोटी ५३ लाखांची भरपाई
मोटार वाहन अपघाताशी संबंधित १९ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यातून संबंधित पक्षकारांना एकूण २ कोटी ५३ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली.
यावेळी विमा कंपन्यांच्या वतीने तसेच पक्षकारांच्या वतीने विविध वकिलांनी काम पाहिले. न्यायालयीन कर्मचारी, महावितरण, विविध राष्ट्रीयकृत बँका, नगरपरिषद, पंचायत समिती तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधीही लोकअदालतीस उपस्थित होते.
बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव स्नेहा मखरे, खजिनदार हर्षद टिकोटे आणि संघटनेच्या सदस्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. मिलिंद देऊळगावकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
पुढील लोकअदालत १२ डिसेंबरला
दरम्यान, पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढून मानसिक त्रास कमी करून घ्यावा आणि जलद न्यायालयीन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी केले आहे.






