बारामतीत आता ‘अधिकारी भेटत नाहीत’च्या तक्रारींना ब्रेक?
महसूल अधिकाऱ्यांना रोज दुपारी ३ ते ५ नागरिक भेटी अनिवार्य; तक्रारी ऐकून घेण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश

बारामतीत आता ‘अधिकारी भेटत नाहीत’च्या तक्रारींना ब्रेक?
महसूल अधिकाऱ्यांना रोज दुपारी ३ ते ५ नागरिक भेटी अनिवार्य; तक्रारी ऐकून घेण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश
बारामती | प्रतिनिधी
नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आता महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात ठराविक वेळ उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या निर्णयानुसार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ हा वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासनाच्या निदर्शनास आले होते की, नागरिक तक्रारी अथवा गाऱ्हाणी घेऊन स्थानिक कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि काही प्रकरणांमध्ये तक्रारी मंत्रालय स्तरापर्यंत पोहोचतात.
यावर उपाय म्हणून शासनाने ‘नागरिकांसाठी अधिकारी उपलब्ध’ राहतील, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, दुपारी ३ ते ५ या राखीव वेळेत कोणतीही अंतर्गत बैठक अथवा व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळेची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी ‘साहेब भेटतील का?’ हा प्रश्नच राहू नये, अशी शासनाची भूमिका या निर्णयातून स्पष्ट होते.
मात्र आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती काटेकोरपणे होते, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.






