“पैशाचा पाऊस” पाडण्याचा दावा… अन् नोटांचा बनावट पाऊस! बारामतीतील तिघे अटकेत; तब्बल ९२ लाखांच्या बनावट नोटा जप्त!

“पैशाचा पाऊस” पाडण्याचा दावा… अन् नोटांचा बनावट पाऊस! बारामतीतील तिघे अटकेत; तब्बल ९२ लाखांच्या बनावट नोटा जप्त!
जिन्याखाली सापडला बनावट नोटांचा खजिना!
बारामती वार्तापत्र
नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून “पैशाचा पाऊस पाडतो” असे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बारामतीतील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ९२ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, तांदुळवाडी, बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (वय २७, झारगडवाडी, बारामती) यांचा समावेश आहे. या टोळीतील आणखी तीन जणांची नावे निष्पन्न झाली असून ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१८ हजार ४१९ बनावट नोटा जप्त
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० रुपये दराच्या तब्बल १८,४१९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय पाच मोबाईल फोन, फोक्सवॅगन कंपनीची मोटार (एमएच १४ डीएफ ०३६५) तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागदांचे बंडल असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक
नगर एमआयडीसी परिसरातील वडगाव गुप्ता रस्त्यावरील विनायक कॉलनीमध्ये गणेश शेवाळे आणि त्याच्या साथीदारांकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असून त्या स्वतःच्या फायद्यासाठी व्यवहारात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह पोलिस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहिद शेख, संदीप पवार, विष्णू भागवत, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धडक दिली.
जिन्याखालील पिशवीत सापडला नोटांचा साठा!
पोलिसांनी गणेश शेवाळे याच्या घराची झडती घेतली असता जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीत बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला. याच ठिकाणी बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदांचे बंडलही पोलिसांच्या हाती लागले.
त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
२५ हजारांत बनावट नोटा खरेदी केल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांच्या चौकशीत गणेश शेवाळे याने बोल्हेगाव येथील दोन साथीदारांसह मालेगाव (नाशिक) येथील एका व्यक्तीकडून २५ हजार रुपये देऊन बनावट नोटा खरेदी केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टोळीतील आणखी तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
“पैशाचा पाऊस”च्या आमिषाने फसवणुकीचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी नागरिकांना “पैशाचा पाऊस पाडतो” असे सांगून त्यांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करत होते. या आमिषातून नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीकरांमध्येही चर्चेला उधाण
या कारवाईत अटक झालेले तिन्ही आरोपी बारामती परिसरातील असल्याने या प्रकरणाचे बारामती कनेक्शन समोर आले आहे. बनावट नोटांचा एवढा मोठा साठा नेमका कुठे आणि कोणामार्फत व्यवहारात आणला जाणार होता, या दिशेनेही तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने कोणाची फसवणूक केली आहे का? आणखी किती जण या रॅकेटमध्ये सहभागी आहेत? बनावट नोटा तयार करण्यामागे नेमका सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत.
अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेली असल्यास संबंधित नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले आहे.






