आरोग्य जनजागृतीला सेवाभावाची जोड! बारामतीत ‘सेवा संकल्प’ अभियानातून विविध उपक्रम
१४० महिलांना आरोग्य मार्गदर्शन; बारामती-इंदापूरमध्ये १०७ रक्तपिशव्यांचे संकलन

आरोग्य जनजागृतीला सेवाभावाची जोड! बारामतीत ‘सेवा संकल्प’ अभियानातून विविध उपक्रम
१४० महिलांना आरोग्य मार्गदर्शन; बारामती-इंदापूरमध्ये १०७ रक्तपिशव्यांचे संकलन
बारामती वार्तापत्र
महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, अवयवदान आणि रक्तदान याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमधून आरोग्यविषयक जागृतीसोबतच सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला.
या अभियानांतर्गत स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती आणि समुपदेशन करण्यात आले. महिलांना आरोग्याची नियमित काळजी घेण्याचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता तसेच विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा एकूण १४० महिलांनी लाभ घेतला. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
अवयवदानाबाबतही वैद्यकीय आणि नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. भूशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात अवयवदानाचे महत्त्व, त्याची गरज, अवयवदानाची प्रक्रिया तसेच याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची शपथ घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.
दरम्यान, ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रक्तदानाबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच इंदापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या दोन्ही शिबिरांच्या माध्यमातून नियमित रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
रक्तसंकलन आणि संबंधित वैद्यकीय प्रक्रियेसाठी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. नाकते यांचे मार्गदर्शन व समन्वय लाभला. विविध विभागांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, समन्वय आणि देखरेख जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आली. महिला आरोग्य, अवयवदान आणि रक्तदान या तीनही महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करत ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आरोग्यसेवेसोबत सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.






